बाळासाहेब ठाकरे यांची तोफ धडाडणारImage Credit source: गुगल
‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’, या वाक्यानेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या तडाखेबंद भाषणांनी महाराष्ट्रात तुफान आणले. त्यांच्या शब्दाचे फटके अनेकांना बसले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मुंबईतच नाही तर राज्यात जनसागर लोटायचा. बाळासाहेबांचे भाषण हे काहींना झणझणीत अंजन असायचे तर काहींना दसऱ्याची शिदोरी. आज नाशकात बाळासाहेब ठाकरे यांची तीच तोफ धडाडणार आहे. आज नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा निर्धार शिबिर होत आहे. या शिबिरात मंथन तर होईलच पण आगामी काळासाठी पक्षाची दिशा सुद्धा स्पष्ट होईल.
बाळासाहेबांच्या विचारांची तोफ धडाडणार
आज नाशकात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची तोफ धडाडणार आहेत. अरे, आवाज कुणाचा म्हटल्यावर आपसूकच शिवसेनेचा असा जयघोष होतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांचे विचार शिवसैनिकांपर्यंत पोहचणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन AI तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांची तोफ पुन्हा धडाडणार आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे निर्धार शिबिर
नाशिकमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिराची सुरुवात झाली आहे. या शिबिराला उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित असतील. नाशिक जिल्ह्यासह 15 विधानसभा मतदारसंघांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे नाशिक दौर्यावर आहेत. हे शिबिर 3 सत्रांमध्ये दिवसभर चालणार आहे. शिबिरात टेक्निकल टीम ,वकिलांची फौज देखील मार्गदर्शन करणार आहे.
दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत पहिले सत्र सुरू झाले आहे. आम्ही इथेच या चर्चासत्राला सुरुवात झाली आहे. खासदार संजय राऊत हे खासदार राजन विचारे, राजाभाऊ वाजे यांची मुलाखत घेत आहेत.
निर्धार शिबिरातून दिशा मिळेल
निर्धार शिबिराबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या शिबिरातून नक्कीच मार्गदर्शन आणि दिशा, प्रेरणा, उत्साह मिळेल. संघर्ष आणि लढण्याची तयारी बाबत पक्षप्रमुख जिद्द जगावणारे दिशादर्शन भाषण होणार आहे. आम्ही लढणारे लोक आहोत. सत्ता आमचा ऑक्सिजन नाही. शिवसेना सत्तेवर फार कमी वेळा गेली. संघर्ष करण्यात आमचे आयुष्य गेलं. सत्तेसाठी काही जण गेले, काहीजण लाचारी, हुजरेगिरी करतांना आम्ही पाहतोय, असा टोला राऊत यांनी हाणला.