Bharat Gavale : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची स्थापना होऊन चार महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी अद्याप रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तटकरे कुटुंब आणि शिवसेना पक्षाचे मातब्बर नेते भरत गोगावले या पदासाठी अडून बसलेले आहेत. दरम्यान, आता भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदावर पुन्हा एकदा महत्त्वाचं भाष्य केलंय. त्यांच्या या विधानानंतर काहीही झालं तरी भरत गोगावले (Bharat Gogawale) माघार घेण्यास तयार नसल्याचा अर्थ काढला जातोय.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद काय?
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले आहेत. पण चार महिन्यांनंतरही रायगड जिल्हा हा पालकमंत्र्यांविनाच आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी अडून बसलेले आहेत. काहीही झालं तरी मलाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातीलच नेत्या आदिती तटकरे यादेखील पालकमंत्रिपद सोडण्यास तयार नाहीत. अदिती तटकरे यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडावी यासाठी त्यांचे वडील सुनिल तटकरे आपली पूर्ण ताकत लावत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाचा तिढा जास्तच वाढला आहे.
अमित शाहांच्या दौऱ्यानंतरही स्थिती जैसे थे
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाहा रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सुनिल तटकरे यांनी पालकमंत्रिपदासाठी शाहांकडे शब्द टाकल्याचे म्हटले जाते. त्यानंतर गोगावले यांचा पत्ता कट होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण गोगावले यांनी केलेल्या ताज्या विधानानंतर अजूनही खेळ संपलेला नाही, असाच संदेश सर्वांना गेल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय.
भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?
भरत गोगावले हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पालकमंत्रिपदावरही ते बोलले. “माझी पालकमंत्रिपदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल. वाघेश्वरकडे आल्यानंतर बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात. माझी पालकमंत्रिदाची इच्छा पण पूर्ण होईल,” असे भरत गोगावले म्हणाले.
दरम्यान आता गोगावले यांच्या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याबाबत नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.