युरोपिय देश, अमेरिका, जपान या देशांशी थेट आंतरराष्ट्रीय ‘कनेक्टिव्हिटी’ उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे; तसेच बड्या विमानांची (कोड डी/ई प्रकारची विमाने) ये-जा सुलभ करण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय हवाई दलाच्या मालकीच्या लोहगाव विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सुटणारा आहे. या विस्तारामुळे बड्या विमानांची हालचाल सुलभ होईल आणि आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकेल, असे मोहोळ यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रवासी संख्येत पुणे देशात नववे
‘नागरी विमान वाहतूक सेवेत भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. तर, सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या देशातील विमानतळांच्या यादीत पुण्याचा नववा क्रमांक आहे. हवाई दलाच्या या विमानतळावरून खासगी विमानांच्या फेऱ्यांवर मर्यादा आहेत. त्यामुळे क्षमता असतानाही या ठिकाणाहून होणाऱ्या विमान प्रवासावर निर्बंध आहेत. गेल्या वर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला आहे. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाची धावपट्टी वाढविण्याची आवश्यकता आहे व सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो,’ असे या पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.
एक किलोमीटरचा विस्तार आवश्यक
सध्याच्या धावपट्टीची लांबी २५३५ मीटर आणि रुंदी ४५ मीटर आहे. या धावपट्टीवर सध्या फक्त एबी-३२१ आकाराचे प्रवासी विमानच उतरू शकते. मोठी विमाने उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी सुमारे एक किलोमीटरने वाढविण्याची आवश्यकता आहे.
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी ‘सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट्स’चे पालन करणाऱ्या क्षेत्राचे (ओएलएस) संयुक्त सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवून हवाई दलाला या सर्वेक्षणासाठी सूचना द्याव्यात, अशी विनंती केली आहे. या संदर्भात येत्या सोमवारी त्यांची भेटही घेणार आहे.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक व सहकार