मुळशी तालुक्यात झाला जन्म
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुठा गावात मुरलीधर मोहोळ यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला. वडील किसनराव मोहोळ यांचे कुटुंब नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी १९८५ च्या दरम्यान पुण्यातील कोथरुडमध्ये आले. पुण्यातील भावे स्कूलमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. आपण जर मुळशी तालुक्याची पार्श्वभूमी पाहिली तर तिथं घराघरात पैलवानकी पाहायला मिळत असते. मोहोळ कुटुंबाला देखील याच पहिलवानकीची पार्श्वभूमी असल्यानं मुरलीधर मोहोळ यांनी शिक्षणासोबत कुस्तीचेही धडे घेतले. पुण्यातील खालकर आणि निंबाळकर तालमीमध्ये कुस्तीचे धडे घेतल्यावर मोहोळ हे कोल्हापुरला गेले. आणि शिवाजी विद्यापीठात पदवीपर्यंतचं (कला शाखा) शिक्षण पूर्ण केलं . मोहोळ याई कुस्तीत आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरच्या आखाड्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर कॉलेज संपवून ते १९९६ च्या दरम्यान पुण्यात परत आले. पुण्यात आल्यावर कुस्तीचे धडे सोडून ते राजकीय आखाड्यात उतरले.
गोपीनाथ मुंडे यांची प्रेरणा घेऊन राजकीय प्रवासाला सुरवात
भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण पाहून मुरलीधर मोहोळही राजकारणात उतरले. तसेच पुण्यात माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या संपर्कात येऊन त्यांनी सुरुवातीला वॉर्ड पातळीवर काम सुरू केलं. लग्नानंतर २००२ साली मोहोळ यांना शिक्षण मंडळाचं सदस्य पद मिळालं. २००६ मध्ये केळेवाडी प्रभाग येथे पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हा पोटनिवडणूक लढण्याची संधी भाजपनं मोहोळ यांना दिली. ही निवडणूक मुरलधीर मोहोळ यांनी जिंकली. त्यानंतर २००७ मधील महापालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीत ते पुन्हा याच भागातून नगरसेवक झाले. पुढे २००९ मध्ये खडकवासला येथून विधानसभा निवडणूक लढवण्याचे आदेश पक्षानं दिले. तेव्हा मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्याविरोधात त्यांनी ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
२०१९ मध्ये झाले पुण्याचे महापौर
पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत मोहोळ तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. महापालिकेत तेव्हा भाजपची सत्ता स्वबळावर आली. मोहोळ यांना पहिल्याच वर्षी स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं. महापालिकेत काम करत असताना मोहोळ यांनी तेव्हा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बड्या नेत्यांची मनं जिंकली. २०१९ मध्ये त्यांना महापौर पद देण्यात आलं. महापौर पद असताना मोहोळ हे कोथरूड विधानसभामधून तयारी देखील करत होते. पण पक्षानं तेव्हा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. यात मोहोळ यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. पण असं असतानाही पक्षाची जबाबदारी मोहोळ यांच्यावर वाढू लागली. ते राज्याचे सरचिटणीस झाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांना पुणे लोकसभेतून खासदारकीचं तिकीट मिळालं आणि आता ते फक्त पुण्याचे खासदार नव्हे तर केंद्रात मंत्री झाले आहेत.