पुणे शहरात सर्वच पक्षांमध्ये नेतृत्व बदलाची नांदी असून, भाजपमध्ये त्याबाबत गांभीर्याने निर्णय घेतल्याचे चित्र गेल्या दहा वर्षांत दिसले आहे. खासदार बापट यांच्या निधनानंतर पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधील वेगवेगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांपासूनच मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी त्यांच्याकडून ‘तयारी’ करून घेण्यास सुरुवात केली होती. अपेक्षेप्रमाणे लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच मोहोळ यांच्या उमेदवारी घोषणा झाली होती.
‘आम्ही मुळशीकर’
मोहोळ कुटुंबीय मूळचे मुळशी तालुक्यातील मुठ्याचे. पुण्यातील भावे हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर मोहोळ यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठत तिथूनच कला शाखेची पदवी घेतली. दरम्यानच्या काळात कोथरूडमधील श्री साई मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. त्यातूनच ते भाजपशी जोडले गेले होते.
मुंडे यांचे समर्थक
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. १९९७मध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी दावेदारी नाकारल्यानंतर पक्षाने त्यांना शिक्षण मंडळ सदस्य केले. सुबराव कदम यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन मोहोळ पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर २००२ आणि २००७मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. २०१२मध्ये त्यांच्या पत्नी मोनिका या नगरसेविका झाल्या. यानंतरच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू अशी मोहोळ यांची ओळख निर्माण झाली.
फडणवीसांचे पटशिष्य
सन २०१७मध्ये पुन्हा नगरसेवक झाल्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाद्वारे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या मुरलीधर मोहोळ यांच्या हाती आल्या. २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूडमधून मोहोळ इच्छुक होते; परंतु पक्षाने तिथे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना संधी दिली गेली होती. दरम्यान, २०१९मध्ये तत्कालीन महापौर मुक्ता टिळक या आमदार झाल्या आणि त्यांच्या जागी मोहोळ महापौर झाले. याच काळात करोनाच्या साथीने डोके वर काढले. या आपत्ती काळात मोहोळ यांच्या नेतृत्वाचे अनेकांनी कौतुक केले. त्यामुळे त्यांच्याकडे भावी खासदार म्हणून पाहिले गेले. दरम्यान, पक्षाने मोहोळ यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मोहोळ हे पुण्यातील राजकारणात आपला दबदबा टिकवून ठेवतील, याची पूर्ण काळजी फडणवीस यांनी घेतली होती. अखेरीस २०२४च्या अटीतटीच्या निवडणुकीत मोहोळ यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत खासदारकीवर आपली मोहोर उमटवली आहे.