राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे, अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे चाकरमान्यांचे देखील हाल सुरूच आहेत.
दरम्यान आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसाठी हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे आज रात्री दहा वाजत समुद्र रौद्ररूप धारण करणार आहे, समुद्रात भरतीमुळे आज चार ते पाच मिटर उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांनी समुद्राच्या जास्त जवळ जाण्याचे धाडस करू नये, असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मुंबईत पावसाचा इशारा
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा मुंबईत हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान कोकण आणि गोवा किनार पट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील 36 तासांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 36 तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे.
मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता
दुसरीकडे यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता आहे. 25 मे पर्यंत केरळात मान्सूनची एन्ट्री होऊ शकते असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. 2009 मध्ये मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता, त्यानंतर आता तब्बल 16 वर्षांनी मान्सूनचं वेळेपूर्वी आगमन होण्याची शक्यता आहे. येत्या 25 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, त्यांनंतर हळहळू मान्सून संपूर्ण देश व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा पावसाचं प्रमाण हे सरासरी पेक्षा अधिक असणार आहे. देशात यंदा 107 टक्क्यांच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.