Mumbai Weather: मुंबईत पाऊससरींची लपाछपी; सकाळी मेघगर्जना, दिवसभर ढगाळ वातावरण, कसे असेल आजचं हवामान?
मुंबई : शहरात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवस पाऊस पडला आणि त्यानंतर पुन्हा दोन दिवस पावसाची प्रतीक्षा करायला लागली. त्यानंतर शुक्रवारची सकाळ मात्र गडगडाटासह पावसाने उजाडली. काही ठिकाणी पाऊससरींनी जोरदार हजेरी लावली, तर काही भागात हलका वर्षाव झाला. त्यानंतर दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण होते. शनिवारीही मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.महाराष्ट्रात या आठवड्याच्या अखेरीपर्यंत फारसा पाऊस नाही, असा अंदाज वर्तवला जात असताना शुक्रवारी सकाळच्या मेघगर्जनेनंतर तुरळक ठिकाणी पावसाने उपस्थिती लावली. त्यानंतर दिवसभरात ढगाळलेले वातावरण होते, मात्र पाऊस नव्हता. सध्या पश्चिमेकडून येणारे वारे कमजोर आहेत. त्यातच चक्रवात विरोधी स्थितीमधून बाहेर येणारे वारे हे पूर्वेकडून येत होते. पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या संघर्षातून मुंबईमध्ये मेघगर्जनेची स्थिती निर्माण झाली, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली.

प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या अद्ययावत पूर्वानुमानानुसार, मुंबईत शनिवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यादेवी नगर, पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये रविवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. उत्तर कोकणात रविवारपासून मंगळवारपर्यंत पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी येथे रविवारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारपासून पुढे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Rain Update: मुंबईत पुन्हा उष्णतेत वाढ, विदर्भात ५ दिवस मुसळधार, १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट
नाशिकमध्ये रविवार, सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस

मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव येथे रविवार आणि सोमवारी मेघर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये गडचिरोली आणि यवतमाळ येथे शनिवारी आणि रविवारी मेघगर्जनेहस पावसाची शक्यता असून, उरलेल्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

मान्सूनचा प्रवास होणार पुन्हा सुरू

सध्या नैऋत्य मौसमी वारे महाराष्ट्रात जळगाव, चंद्रपूर, अमरावती येथपर्यंत पोहोचले असून १० जूननंतर मान्सूनची प्रगती झालेली नाही. बंगालच्या उपसागरातील मान्सून शाखा ३१ मेनंतर पुढे सरकलेली नाही. मात्र येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे.