Mumbai Weather: सरींनंतर पुन्हा लाही; आर्द्रता, पावसाच्या अभावामुळे मुंबईकर उकाड्याने त्रस्त, कधी पडणार पाऊस?

मुंबई : बुधवारी चेंबूर, देवनार भागामध्ये तुरळक पाऊस पडला. उर्वरित मुंबईमध्ये फारसा शिडकावाही नसल्याने शहराचे तापमान पुन्हा चढले. वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि पावसाचा अभाव यामुळे दिवसभर अस्वस्थ करणारी जाणीव मुंबईकरांमध्ये होती. कुलाबा येथे कमाल तापमानाचा पारा २४ तासांमध्ये २.३ अंशांनी चढला, तर सांताक्रूझ येथे १.३ अंशांनी मंगळवारपेक्षा बुधवारचे तापमान अधिक नोंदले गेले. दोन्ही केंद्रांवर आर्द्रता दिवसभरात ७० टक्क्यांच्या आसपास असल्याने पावसामध्ये आगमनालाच आलेल्या व्यत्ययाचा मुंबईकरांना त्रास होत आहे.कुलाबा येथे ३२.७ तर, सांताक्रूझ येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. बुधवारी दिलेल्या अद्ययावत पूर्वानुमानानुसार मुंबईमध्ये रविवारी १६ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे येत्या काळात तापमानाचा पारा ३०च्या खाली उतरण्याची शक्यता नाही. गुरुवार आणि शुक्रवारी ३३च्या आसपास कमाल तापमानाचा पारा असू शकेल आणि त्यानंतर आठवडाअखेरीस पारा ३४ अंशांपर्यंत पुन्हा चढेल, असा अंदाज आहे. या कालावाधीत आभाळ ढगाळलेले असेल.

मुंबईसह दक्षिण कोकण, उत्तर कोकणात पालघर, ठाणे हे जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, नगर आणि सोलापूर, लातूर आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये गुरुवार मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल. संपूर्ण विदर्भात रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता असली तरी बुधवारी मान्सून जळगाव, अमरावती, चंद्रपूरपर्यंत पुढे सरकला. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पोहोचला असला तरी बुधवारी भारतीय हवामान विभागाने राज्यातील मान्सूनच्या पुढील प्रवासाबद्दल अंदाज वर्तवलेला नाही. तसेच पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सूनची बंगालच्या उपसागरातील शाखाही पुन्हा सक्रिय होऊ शकेल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर पोहोचण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असाही अंदाज आहे…
Mansoon Update In Maharashtra : ‘मान्सून’ने महाराष्ट्र सुखावला, नाशिक-जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पेरण्यांना आला वेग
विदर्भातात दिलासा

कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पावसाअभावी तापमान चढे असले तरी विदर्भात मेघगर्जनेसह वारे आणि पाऊस असल्याने विदर्भातील कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, ब्रह्मपुरी येथे सरासरीपेक्षा ४ ते ७ अंश सेल्सिअस कमी नोंदले गेले. मराठवाड्यातही ३ ते ४ अंशांनी सरासरीपेक्षा काही केंद्रांवर कमाल तापमान कमी नोंदले गेले असून, येथे कमाल तापमानाचा पारा ३० ते ३२ अंशांदरम्यान नोंदला गेला.