Mumbai Water Supply : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा…! महापालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गत वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य सरकारने यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठयावर महापालिकेचे बारकाईने लक्ष असून ३१ जुलैपर्यंत पुरेल, अशा रितीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. मात्र मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजच्या घडीला पाणीसाठा आणि नियोजन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी बैठक घेतली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये मिळून सध्या २ लाख ३८ हजार ५५२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर गरजेच्या तुलनेत हा साठा १६.४८ टक्के आहे. त्याचप्रमाणे भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणातून ९१ हजार १३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. हा सर्व साठा मिळून प्रतिवर्षीप्रमाणे ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन महापालिकेने केले आहे.
पैसाच पैसा… अब्जाधीशाच्या तिजोरीत रोकडीचा डोंगर, कॅश इतकी की खर्चच होईना! डोक्याला झाला ताप

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे आगमन वेळेवर होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. मे अखेरीस हवामान विभागाकडून पावसाविषक अंदाज वर्तवले जाणार आहेत. पावसाचे अंदाज लक्षात घेऊन त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिकेकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेऊन आगामी काळातील धोरण निश्चिती केली जाईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. ‘पाणीसाठ्याची उपलब्धता पाहता सध्या मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू केलेली नाही. मात्र महापालिकेने केलेल्या नियोजनाला मुंबईकरांचे सहकार्य लाभले पाहिजे. मुंबईतील सर्व व्यावसायिक आणि वाणिज्यिक आस्थापनांनीही आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारावे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा’, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त गगराणी यांनी केले आहे.

-दाढी, अंघोळ जपून करा!
– अंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होईल. नळ सुरू ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा.
– घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यामध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.
– वाहने धुण्यासाठी भांड्यामध्ये पाणी घेऊन ओल्या कापडाने पुसा. घरातील फरशा, जिने धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका.
– वॉशिंगमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास मशिनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होऊ शकतो.
– उपहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे, अथवा पाण्याची बाटली द्यावी.
– छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना ओसंडून वाहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी