शीव रेल्वे उड्डाणपूल सर्व वाहतुकीसाठी बंद करून त्याचे पाडकाम करण्यासाठी २० जानेवारी, २८ फेब्रुवारी आणि २७ मार्च अशा तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र विविध कारणांमुळे पाडकाम रखडले. मार्चनंतर लोकसभा निवडणुकीचे कारण समोर आले होते. आता २१ जूनच्या मध्यरात्रीपासून अवजड वाहतुकीला बंदी घालून पूल पाडण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-२ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका प्रकल्प पूर्ण होणार आहे. सीएसएमटीतील जागेच्या अडचणीमुळे कुर्ला ते परळ आणि परळ ते सीएसएमटी असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा पूर्ण करताना शीव रेल्वे उड्डाणपूल हा अडथळा असल्याने हा पूल पाडून त्या जागी नवा पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे शीव रेल्वे उड्डाणपूल शक्य तितक्या लवकर पाडून अतिरिक्त रेल्वे मार्ग उभारणीचे नियोजन मध्य रेल्वेचे आहे.
उंचीचे बॅरिकेड उभारणार
शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना ३.६० मीटर उंचीचे बॅरिकेड उभारण्यात येणार आहेत. यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पुलावरून अवजड वाहने धावणार नाहीत. दरम्यान, वाहतूक पोलिसांसह संबंधित विभागांशी बोलणी सुरू असून त्यांच्या मंजुरीनंतर तातडीने पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.