Mumbai Rains: पुढील काही तासात मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात कुठे-कुठे सरी बरसणार? वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: राज्यात मान्सूनने वेळेपुर्वीच हजेरी लावली. मात्र, त्यानंतर आठवडाभर पावसाने ब्रेक घेतलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली होती. पण, अखेर पावसाने पुन्हा एकदा राज्यात दमदार हजेरी लावली आणि नागरिक सुखावले. मुंबईसह काही भागात मंगळवारपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

मंगळवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. तर आज बुधवारीही पाऊस कोसळत आहे. पहाटेपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे येत्या काही तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

१८ ते २५ जूनदरम्यान जोरदार पाऊस

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, १८ जून ते २५ जून यादरम्यान मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

तसेच, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात पुढील ३ ते ४ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसेल. तर, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातीलही काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

४८ तासात मान्सून राज्य व्यापेल

येत्या ४८ तासात मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कुठे-कुठे पावसाचा इशारा?

आज विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशीवमध्येही जोरदार पाऊस कोसळेल. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूरमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.