लोअर परळ येथील सखल भागातही पाणी साठले होते. अंधेरी सबवे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले.
रविवार आणि भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामन्यामुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. मात्र शाळा सुरू होणार असल्याने शेवटचा रविवार म्हणून काहीजण मुलांना घेऊन फिरण्यासाठी बाहेर पडले. रात्री अचानक पावसाला सुरुवात झाल्याने घर गाठताना मुंबईकरांचे हाल झाले. छत्र्या, रेनकोट सोबत नसल्याने भिजत घरी परतले.
वाहतूक खोळंबली
अचानक आलेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला. ठिकठिकाणी वाहने बंद पडणे, दुचाकी घसरण्याच्याही घटना अनेक भागांतून समोर आल्या. रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. वडाळा फ्री-वेवर दक्षिणेकडे पाणी साचल्याने या भागात वाहतूककोंडी झाली होती. परळ टीटी, अंधेरी सबवे, भायखळा येथील वाहतूक पाणी साचल्याने काही वेळ बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांच्या नियंत्रण कक्षात तसेच सोशल मीडियावर वाहतूककोंडी, वाहने बिघाडाच्या अनेक तक्रारी येत होत्या. मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग मंदावल्यावर पाणी ओसरले आणि पहाटेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.