सध्या मध्य भारतात पावसाला चालना देणारे मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याजवळ सरकलेले आहे. त्यामुळे उत्तरेकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र मध्य भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नाही. मुंबई आणि परिसरात पावसासाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत होणे, कोकण किनारपट्टीवर ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण होणे, असे घटक सक्रिय नाहीत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात २८ जूनला कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये असे पूरक क्षेत्र कार्यरत नसल्याची माहिती हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
बंगालच्या उपसागरामध्ये एखादे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि ते पश्चिमेकडे सरकले तर अरबी समुद्रातील वारे तीव्र होतात. उत्तर कोकणातील पावसासाठी आवश्यक असलेली ही अनुकूल परिस्थिती सध्या दिसत नाही. यासोबतच उत्तर कोकणामध्ये पावसासाठी आवश्यक असणारे कोकण किनारपट्टीवरील द्रोणीय क्षेत्रही सध्या दक्षिण कोकण ते केरळपर्यंत सक्रिय आहे. हे क्षेत्र जेव्हा गुजरातपासून केरळपर्यंत कार्यरत असते तेव्हा त्याचा फायदा मुंबईच्या पावसाला होतो. हे क्षेत्र गुजरातपर्यंत वर सरकले तर मुंबईमध्ये चांगला पाऊस पडू शकेलस असेही ते म्हणाले. या द्रोणीय स्थितीमुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांची ताकद वाढते आणि आर्द्रता भूभागापर्यंत पोहोचते. मात्र सध्या ही परिस्थितीही सक्रिय नसल्याचे होसाळीकर म्हणाले.
विदर्भाच्या काही भागात तसेच लगतच्या मराठवाड्याच्या भागातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात सर्वदूर पाऊस आहे. या पावसाचा जोर खूप जास्त नसला तरी याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.