मुंबईला शनिवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे
मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसाचा जोर ओसरला असला, तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. हवामान विभागाने येत्या सोमवारपर्यंतचा पावसाचा अंदाज प्रसृत केला. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईला शनिवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असल्याने आठवडाअखेर पावसाची असणार आहे.
शुक्रवारी मुंबईला यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने सोमवार, १५ जुलैपर्यंतचा पावसाचा अंदाज प्रसृत केला आहे. मुंबईला शुक्रवार, रविवार आणि सोमवारसाठी ‘यलो अलर्ट’ असून तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. शनिवारी मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी, तर पालघर जिल्ह्यासाठी शनिवारी ‘ऑरेंज अलर्ट’ असेल.
विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुंबई ठाण्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक असेल. या जिल्ह्यांना पुढचे चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
मुंबईमध्ये गुरुवारी दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू होती. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. दिवसभरात कुलाबा वेधशाळेत २९ मिलीमीटर, तर सांताक्रूझमध्ये १७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.