मुंबईत पावसाचा जोर वाढला आणि त्याच काळात समुद्राला भरती आली, तर पाणी साचते, असा एक मुद्दा मांडला जातो, परंतु समुद्राला भरती नसतानाही सखल भागांत पाणी साचण्याचे प्रकार घडतात. भरती असली, तर या भागांमध्ये अक्षरश: पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. दुसरीकडे पाणी साचणाऱ्या ठिकाणी महापालिकेने उपाययोजना केल्यानंतर पावसात जलमय होणारी नवनवी ठिकाणे तयार होत राहतात. म्हणूनच पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात मुंबई महापालिकेला अद्याप यश आलेले नाही.
मुंबईत ९ जूनच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे ३०पेक्षा अधिक ठिकाणी पाणी साचले. रात्रीच्या वेळेस भरती होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली. यावरून महापालिकेकडून नालेसफाईसह केल्या जाणाऱ्या विविध कामांवर टीका करण्यात आली. यानंतर महापालिकेने पहिल्याच पावसात मुंबईत पाणी कुठे साचले, याची माहिती गोळा केली. यापूर्वीची पाणी साचणारी ठिकाणे आणि भर पडलेली नवीन ठिकाणे, याची माहिती घेऊन अभ्यास केला जात आहे, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ‘मुंबईतील काही बैठ्या घरांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणी साचलेल्या ठिकाणांमधील नालेसफाईच्या कामांचाही आढावा घेण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ४८१ पंप सज्ज आहेत’, अशी माहिती देण्यात आली.
डोकेदुखी वाढती
मुंबईत सन २०२२मध्ये ६० ठिकाणी पाणी साचत होते. सन २०२३मध्ये यामध्ये ६७ नवीन ठिकाणांची भर पडली आणि ही संख्या १२७वर गेली. यापैकी २९ ठिकाणांवर गेल्या वर्षी पावसाळ्याआधी उपाययोजना करण्यात आल्या, परंतु ९८ ठिकाणांवरील कामे अद्याप बाकी आहेत. ती प्रगतिपथावर आहेत.
समस्या दूर करण्यासाठी…
– सखल भाग असल्यास त्याची काही प्रमाणात उंची वाढवणे, तेथील नालेसफाई
– उड्डाणपुलांजवळील भाग असल्यास तेथे कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी नवीन यंत्रणा
– विक्रोळी येथील छोटे नाले साफ न केल्याने तेथील काही भागांत पाणी साचले होते. योग्य सफाई न झाल्याने कंत्राटदाराला २५ हजार रुपयांचा दंड