भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये 25 भारतीय तर एका नेपाळी नागरिकाचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पाउलं उचलली, सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले,  त्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न होत आहे, मात्र भारताकडून हे हल्ले परतून लावण्यात आले आहेत. प्रत्युत्तर म्हणून भारतानं देखील पुन्हा एकदा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे, या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत उद्यापासून फटाके आणि रॉकेट उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 11 मे पासून ते 9 जूनपर्यंत मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे, या संदर्भात मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

पाकिस्तानकडून कुरापती सुरूच 

दरम्यान पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, भारतानं हा हल्ला परतून लावला, त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला, पाकिस्तानच्या 15 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली, मात्र त्यानंतर देखील पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, सीमा भागामध्ये देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. भारताकडून देखील पाकिस्तानच्या या कृतीला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे, भारतानं केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसानं झालं आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)