Mumbai News: पुण्याच्या अपघाताचं मुंबईवर सावट, शहरातील बार, पबवर प्रशासनाची करडी नजर

प्रतिनिधी, मुंबई : पुणे येथील अपघात प्रकरणानंतर आता मुंबईतील यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत. मुंबईतील बार, पब, डिस्को यांची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. अधिकृत, अनधिकृत पासून परवानग्या, नियमांचे पालन होतेय का? हे तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पुणे येथे अल्पवयीन चालकाने दोघांना उडविल्याने वातावरण प्रचंड तापले आहे. आपघातपूर्वी या मुलाने मद्य प्राशन केले होते. त्यामुळे अल्पवयीन मुलांना प्रवेश देणारे बार, पब, डिस्को तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. मुंबई पोलीसही सतर्क झाले असून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. बार, पब, डिस्को या आस्थापना अनेक नियमांचे उल्लंघन करतात. पोलिसांबरोबर पालिका, गृह विभाग, अग्निशमन दल, उत्पादन शुल्क विभाग यासारख्या सर्व यंत्रणांच्या परवानग्या तसेच त्यांच्या नियम आणि अटींची पूर्तता करणे मालक आणि चालक यांना बंधनकारक असते. सर्व नियमांचे पालन होते का याची तपासणी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. काही त्रुटी आढळल्यास त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्या यंत्रणाच्या अखत्यारीत नियमभंग असेल ती यंत्रणा कारवाई करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुणे अपघातप्रकरणानंतर पोलिसांची सावधगिरी

नियमित तपसणी करण्याचे पोलिसांना आदेश

नियमात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई

पोलिस तपासणी

– बार, पब, डिस्को अधिकृत आहे का

– पालिकेचा गुमास्ता परवाना, इतर परवानग्या घेतल्या आहेत का

– जागेचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले आहे का

– अग्निशमन दलाच्या वतीने फायर ऑडिट करण्यात आले आहे का

– बारमध्ये, पबमध्ये मद्यपान करण्यासाठी प्रौढ व्यक्तीनाच प्रवेश दिला जातो का

– आस्थापनामधील सीसीटीव्ही सुरू आहेत का

पवईत बारमध्ये अल्पवयीन मुलगा

पवई पोलिसांचे पथक तपासणी करीत असताना एल अँड टी गेट क्रमांक ६ समोरील लोटस बार अँड रेस्टॉरंटमध्ये एक अल्पवयीन मुलगा दारू पीत असल्याचे दिसले. पोलिसांनी या मुलास ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे समोर आले. बारचा व्यवस्थापक आणि वेटर या दोघांनीही तो प्रौढ आहे का हे तपासले नाही. त्यामुळे व्यवस्थापक टेकबहदूर आयेर आणि वेटर विकास राणा यांच्याविरुद्ध पवई पोलिसांनी अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.