प्रतिनिधी, मुंबई : ‘एनटीपीसी’ या देशातील सर्वांत मोठ्या वीज कंपनीकडील कोळसासाठा मंत्रालयाने आखून दिलेल्या प्रमाणापेक्षा आठ टक्के कमी असल्याचे समोर आले आहे. कंपनीने अलिकडेच घोषित केलेल्या आर्थिक निकालात ७७ टक्के कोळसासाठा असल्याचे नमूद आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानुसार तो किमान ८५ टक्के असणे अपेक्षित आहे.राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ लिमिटेड (एनटीपीसी) ही देशातील सर्वांत मोठी वीज कंपनी आहे. कंपनीने अलिकडेच २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे निकाल जारी केले. त्यानुसार मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात सरासरी कोळसासाठा ७७.२५ टक्के असून, तो ६९.४९ टक्के या राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत अधिक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
उपकंपन्यांना वगळून कंपनीच्या एकल आर्थिक ताळेबंदाचा विचार केल्यास कंपनीच्या नफ्यात फक्त पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘एनटीपीसी’ या नात्याने एकल युनिटला २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक लाख ६५ हजार ७०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. हा आकडा त्याआधीच्या आर्थिक वर्षात एक लाख ६७ हजार ७२४ कोटी रुपये होता. यानुसार कंपनीचा नफा १७ हजार १९७ कोटी रुपयांवरून १८ हजार ०८९ कोटी रुपयांवर पोहोचला.