त्यानुसार हा कॉरिडॉर उभा करण्यासाठी प्राथमिक पात्रता पडताळणी ‘एमएसआरडीसी’ने याआधी केली होती. त्यात पात्र ठरलेल्या कंपन्यांसाठी जानेवारीत प्रत्यक्ष बांधकामाची निविदा काढण्यात आली होती. या निविदेतील सर्वांत कमी बोली लावणाऱ्या कंपन्या अंतिम झाल्या आहेत. सर्वांत कमी किमतीची बोली असूनही प्रत्यक्ष निविदेपेक्षा बांधकामात खर्चवाढ असल्याची स्थिती आहे.
हा विशेष महामार्ग ‘विरार-अलिबाग कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जात असला तरी त्याची सुरुवात वसई तालुक्यातील नवघर येथून होणार असून, पेण तालुक्यातील बळावलीपर्यंत तो असेल. बांधकामाचा पहिला टप्पा वसई तालुक्यातील बापने गावापासून ते भिवंडी तालुक्यातील पाये गावापर्यंत असेल. तर ११ वा व अखेरचा टप्पा रायगड जिल्ह्यातील चिरनेरपासून उरण तालुक्यातील गोविर्लेपर्यंत असेल. अशा ११ पॅकेजमध्ये ही निविदा काढण्यात आली होती. त्यापैकी बापने ते पाये पॅकेजचा खर्च सर्वाधिक २७६३ कोटी रुपये असेल, असे निविदा प्रक्रियेअंती निश्चित झाले आहे.
या ११ पॅकेजमध्ये हा महामार्ग बांधण्यासाठी एकूण सात कंपन्यांनी सर्वांत कमी किमतीच्या निविदा जिंकल्या आहेत. त्यामध्ये नवयुग, ओरिएन्टल, एल अँड टी, इरकॉन, जे. कुमार, मेघा इंजिनीअरिंग, वेल्स्पन यांचा समावेश आहे. यापैकी ओरिएन्टल, एल अॅण्ड टी, इरकॉन व जे.कुमार यांची प्रत्येकी दोन पॅकेजच्या बांधकामाची निविदा सर्वांत कमी किमतीची ठरल्याने ते त्या पॅकेजच्या बांधकाम निविदेचे विजेते ठरले. सर्व ११ पॅकेजमधील संबंधित कंत्राटदारांना ३० महिन्यांच्या कालावधीत या मार्गाचे बांधकाम पूर्ण करणे अत्यावश्यक असेल.
निविदा काढताना आम्ही समृद्धी महामार्गाच्या दरांचा विचार करून त्यात महागाईनुसार थोडी वाढ केली होती. त्यामुळे निविदांमधील अंदाजित खर्च काहिसा कमी होता. आता प्रत्यक्ष कंत्राट देताना मात्र रस्ते बांधणीचा राज्याच्या चालू नियोजित दरांचा विचार केला जाईल. त्यानुसार कंपन्यांनी दिलेली किंमत व चालू दरांनुसार आम्ही निश्चित केलेला खर्च, यांचा अभ्यास आता सुरू आहे. किमान १५ दिवस हा अभ्यास चालेल. त्यानंतर आवश्यतेनुसार कंपन्यांशी वाटाघाटी करून सुयोग्य खर्चात हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी कंत्राट निश्चित केले जाईल.
-अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
निविदा जिंकणाऱ्या कंपन्या अशा
पॅकेज क्रमांक कुठून-कुठे अंतर (किमीमध्ये) सर्वांत कमी किमतीची निविदा (कोटी रुपयांत) कंपनी
१ बापने-पाये ८.३९ २७६३ नवयुगा
२ पाये-काल्हेर १२.३९ २५२७ ओरिएन्टल
३. काल्हेर-अंजूर ५.२८ २६७३ ओरिएन्टल
४. अंजूर-कल्याण ६.३१ २६२० एल अँड टी
५. काटई-नितळस ८.४४ २६८८ एल अँड टी
६. नितळस-उमरोली १२.८३ २३६१ इरकॉन
७. उमरोली-बोर्ले ८.२४ २४३९ इरकॉन
८. बोर्ले-वडघर ८.३४ २१३८ जे.कुमार
९. वडघर-जांभूळपाडा ९.१२ २१८६ मेघा इंजि.
१०. जांभूळपाडा-कळंबसुरे ९.३३ २०४० जे.कुमार
११. कळंबसुरे-गोविर्ले ७.७९ १८६५ वेल्स्पन
एकूण ९६.४८ २६,३००