अवैध पार्किंगवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र काही वेळानंतर त्याच ठिकाणी दुसरे वाहन उभे केल्याचे निदर्शनास येते. महापालिकेने वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध केली असताना अनेकदा अधिकृत पार्किंगमध्ये गाडी उभी न करता शेजारील रस्त्यावर पार्क केली जाते. वाहनचालकांना शिस्त लागावी आणि पार्किंगच्या ठिकाणी वाहन उभे करावे, यासाठी रस्त्यांवर कुठेही बेकायदा वाहन उभे करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार महापालिकेला मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहे.
तत्कालीन महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी पार्किंग धोरण मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. पार्किंग धोरणांतर्गत महापालिकेला कारवाईचे अधिकार मिळावेत, यासाठी पालिकेच्या १९८८ च्या पार्किंग नियमावलीत सुधारणा करण्याची विनंती यात सरकारला करण्यात आली आहे.
अनधिकृत ठिकाणी गाड्या उभ्या करण्यास लगाम घालण्याचा प्रयत्न
महापालिकेच्या पार्किंग धोरणामध्ये कारवाईचा समावेश
वाहतूक पोलिसांकडून मान्यता; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
महापालिकेकडून पार्किंग सुविधा
मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेचे एकूण ४८ हजार २९० गाड्यांसाठी पार्किंग उपलब्ध आहे. ९७ ऑन-स्ट्रीट पार्किंगमध्ये २१ हजार ४६२ वाहने आणि ३३ ऑफ-स्ट्रीट पार्किंगमध्ये २६ हजार ८२८ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था महापालिकेने केली आहे. रस्त्यावरील पार्किंगमध्ये दुचाकी, तीनचाकी, कार, बस आणि मोठ्या वाहनांसाठी रस्त्यावर पार्क करता येतील, तर ऑफ-स्ट्रीट पार्किंगमध्ये दादर शिवाजी पार्क, इंडिया बुल्स, सात रस्ता व वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.
पार्किंग ॲप कागदावरच
मुंबईत गाड्या पार्क करण्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने पाच वर्षांपूर्वी मोबाइल ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत कुठूनही कुठे सशुल्क गाडी पार्किंगसाठी या ॲपद्वारे बुकिंग करणे शक्य होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पाच वर्षे उलटूनही हे ॲप अद्याप कागदावरच आहे.