Mumbai News: फक्त घोषणा करायच्या, द्यायचे तर काहीच नाही, जयंत पाटील सरकारवर संतापले!

मुंबई: आता सगळ्या योजना जाहीर होतील, अर्थसंकल्पात खैरात करण्यात येईल. महिलांना महिन्याला पैसे देण्याची घोषणा होईल, लहान मुलींना पैसे देण्याची घोषणा होईल, युवकांच्या बेरोजगारीबाबत घोषणा होईल. फक्त घोषणा करायच्या, द्यायचं तर काहीच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी केली आहे.
Mumbai News: सामाजिक ऐक्याबाबत तडजोड करणे योग्य नाही, चुकीची भूमिका कुणी घेऊ नये, शरद पवारांचे वक्तव्य
राज्याचे अर्थसंकल्पीय तसेच पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर निधी वाटपाच्या तसेच अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यावर पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. पाटील म्हणाले की, अडीच महिन्यांनी निवडणुका आहेत म्हणून ज्या गोष्टी पूर्ण करता येणार नाहीत. ज्या अर्थसंकल्पाला सुसह्य होणार नाहीत अशा सगळ्यांची खैरात आता दोन दिवसांत पाहायला मिळेल. सरकार घाबरलेले आहे. त्यांना खात्री आहे की आपण पुढच्या वेळी निवडून येत नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणून अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या जनतेला वेगळे काहीतरी दिसेल.

राम मंदिराच्या कामाची चौकशी व्हावी

राम मंदिराची बांधकाम पहिल्या पावसातच गळायला लागले असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. जगभरातील सर्व रामभक्तांचा हा अवमान आहे. राम मंदिराच्या गळतीसंदर्भात चौकशी झाली पाहिजे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यासाठी कोण जबाबदार आहे, याची चौकशी झाली पाहिजे. घाईने बांधकाम करा व निवडणुकीआधी मंदिराची सुरुवात करा आणि पहिली पूजा करण्याचा मान मिळविण्यासाठी जे खटाटोप करत होते त्या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.