Mumbai Metro 9 कारशेडसाठी करोडोंचे डील; ‘या’ तीन कंपन्या उत्सुक, कसे असेल हे कारशेड?

प्रतिनिधी, मुंबई : दहिसरला मिरागावशी जोडणाऱ्या मेट्रो-९ उन्नत मार्गिकेच्या कारशेड (गाड्या दुरुस्ती डेपो) उभारणीची तयारी पुढील टप्प्यात गेली आहे. ६२६ कोटी रुपयांच्या या कारशेडच्या उभारणीसाठी तीन कंपन्यांनी निविदा भरली आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात निविदा काढण्यात आली होती.मेट्रो-९ ही मेट्रो-७ (गुंदवली-दहिसर) व मेट्रो-२अ (अंधेरी पश्चिम-आनंदनगर, दहिसर) यांना मिरा-भाईंदरशी जोडणारी १३.५८ किमी लांबीची दहा स्थानकांची उन्नत मार्गिका आहे. ही मार्गिका भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमपर्यंत जाते. या मार्गिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील उत्तन परिसरातील डोंगरी या गावात कारशेडची उभारणी होणार आहे. त्यानुसार ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने मागील वर्षी यासाठी ५९.६३ हेक्टर जमीन एमएमआरडीएकडे वर्ग केली. या जमिनीवर आता गाड्यांच्या दुरुस्तीसाठी डेपो उभारणीसाठी एमएमआरडीएने निविदा काढली होती.

या निविदेनुसार, एकूण ६२६ कोटी ६८ लाख ७६ हजार ८४७ रुपयांचा अंदाजित खर्च असलेल्या या कारशेडच्या उभारणीसाठी के. पी. सी. प्रोजेक्ट लिमिटेड, एन. सी. सी. लिमिटेड व ऋत्विक प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड या तीन कंपन्यांनी रस दाखवला आहे. सध्या या निविदेचा तांत्रिक भाग उघडण्यात आला असून, त्यात या तीन कंपन्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले.
Mumbai Metro: मेट्रो २अ, मेट्रो ७मध्ये तीन कोटींचा घोटाळा; मनुष्यबळ कमी पुरवूनही मोबदला घेतला पूर्ण
संबंधित कंत्राटदाराला मागणीपत्र दिल्यापासून हा दुरुस्ती डेपो ५२ आठवड्यांत उभा करायचा आहे. त्यामध्ये गाड्या उभ्या करण्याची जागा व रूळ, कारशेडचे नियंत्रण केंद्र, प्रशासकीय इमारत, देखभाल व पाहणी इमारत, आपत्कालिन विजेसाठीचे उपकेंद्र, अंतर्गत रस्ते, भूमिगत वाहिन्या, मलनिस्सारण प्रणाली, पावसाळी जलपुनर्भरण, प्लंबिंग निगडित कामे कंत्राटदाराला करायची आहेत. या दुरुस्ती डेपोमधील रुळांवर एकाच वेळी २० गाड्या उभ्या राहू शकतील, असा ‘स्टॅबलिंग यार्ड’ उभा करणे प्रस्तावित आहे. या डेपोची उभारणी एकूण सात टप्प्यात होणार आहे, तसे नियोजन कंत्राटदाराला करायचे आहे.

डोंगरीचा विकास आराखडा अद्याप नाही

या मार्गिकेच्या मूळ विकास नियोजन आराखड्यानुसार (डीपीआर), गाड्यांच्या दुरुस्तीसाठी आधी नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडिअममागील राई गावाची निवड झाली होती. त्यानुसार डेपोचे आरेखन डीपीआरमध्ये करण्यात आले आहे. मात्र तेथील गावकऱ्यांच्या विरोधामुळे हा डेपो तेथून सुमारे चार किमी पुढे, डोंगरी येथे हलवण्यात आला. मात्र डोंगरी येथील कारशेडसाठीचा डीपीआर अद्याप तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे