आंदोलनानंतर झालेल्या विलंबानंतरही मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३मध्ये सुरू होईल, अशी घोषणा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर ही मार्गिका एप्रिलमध्ये सुरू होईल, असे कंपनीकडून एका कार्यक्रमात घोषित करण्यात आले होते. मात्र त्यावेळी स्थानक उभारणीसह गाडीची चाचणी बाकी होती. या चाचण्यांनंतर जूनअखेरीस ही मार्गिका सुरू होईल, असे सांगितले जाते. मात्र अद्याप मार्गिकेतील काही चाचण्यांसह सुरक्षेसंबंधीचे प्रमाणीकरण बाकी आहे.
एमएमआरसीतील सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी प्रत्येकी आठ डब्यांच्या अत्याधुनिक नऊ गाड्या ताफ्यात आल्या असून त्यांची वेगांची चाचणी पूर्ण झाली आहे. रिसर्च अँड डिझाइन स्टँडर्डस् ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) मानकांनिहाय ही चाचणी असते. मात्र विद्युत प्रणाली व डब्यांची सिग्नल यंत्रणेसह एकात्मिकरणाची चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर प्रमाणीकरण होणार आहे.
महत्त्वपूर्ण चाचण्या
मेट्रो मार्गिका सुरू करण्याआधी त्यातील ‘आरडीएसओ’ चाचण्या सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. त्यात डबे वेगाने धावतात. ती चाचणी पूर्ण झाली असली, तरीही सर्व चाचण्यांअंती कमिशनर ऑफ मेट्रो सेफ्टी (सीएमआरएस) यांचे सुरक्षा निरीक्षण होते व त्यांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मार्गिका सुरू करता येते. त्यास विलंबाची शक्यता आहे.