Mumbai Local: जायचे गोरेगावला, सिग्नल वाशीचा; गार्डच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली, काय घडलं?

प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील (सीएसएमटी) मुख्य मार्गावरील लोकल खोळंब्याचे सत्र कायम असून, शनिवारी यात हार्बर मार्गावरील लोकलघोळाचीही भर पडली. सीएसएमटीहून गोरेगावला जाणाऱ्या लोकलला वाशीच्या दिशेचा सिग्नल देण्यात आला. विशेष म्हणजे, ही बाब मोटरमनच्या लक्षात न आल्याने लोकल वाशीच्या दिशेने निघाली. परंतु, गार्डने प्रसंगावधान दाखवत काही मीटरवरच गाडी थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या घोळामुळे एकामागे एक लोकल खोळंबल्याने हार्बर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

सीएसएमटीहून सकाळी १०.५४ वाजताची गोरेगाव लोकल वेळापत्रकाप्रमाणे गोरेगावसाठी रवाना झाली. शनिवारचा दिवस असल्याने गाडीमध्ये तुरळक प्रवासी होते. गाडी ११.१५च्या सुमारास वडाळा रोड स्थानकात पोहोचली. या स्थानकातून गोरेगावला जाण्यासाठी सरळ मार्गिका असून, उजवीकडे पनवेल-वाशी मार्गिका आहे. स्टेशन मास्तरकडून गोरेगावऐवजी वाशीच्या दिशेचा सिग्नल देण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar : पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या घशाला कोरड, तहानलेल्या गावांना २०१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

योग्य वेळापत्रक उपलब्ध नसल्याने चुकीचा सिग्नल

स्टेशन मास्तरकडे योग्य वेळापत्रक उपलब्ध नसल्याने चुकीच्या मार्गावरील सिग्नल दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीअंती याचे नेमके कारण समोर येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या गोंधळामुळे वडाळा स्थानक परिसरात लोकल वाहतूक १५ मिनिटे खोळंबली व सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.