ठाणे स्थानकात मॉड्युलर फलाट उभारणी यशस्वी झाल्याने ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अतिशय वर्दळीच्या फलाट क्रमांक ५ चे रुंदीकरण करण्यासाठी मॉड्युलर फलाटाचा (प्री-कास्ट बॉक्स वापरून तयार केलेला फलाट ) वापर करण्यात आला आहे. आता पाच नंबर फलाट १३ मीटर रुंद झाला असून, त्यावरून सुमारे १,१०० चौरस मीटर अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे. या जागेत सरकते जिने, रुंद जिने आणि अन्य प्रवासी सुविधा उभारण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘सीएसएमटी’तील फलाट लांबीनंतर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉक यशस्वीपणे पूर्ण झाल्याने २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालवण्यासाठी नवा फलाट पर्याय खुला झाला आहे. सध्या ‘सीएसएमटी’तून फलाट क्र. १४/१८ ची लांबी योग्य आहे. यात आता १०/११ या फलाटांची ही भर पडली आहे. वाढीव डब्यांच्या मेल-एक्स्प्रेसमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखरूप आणि आरामदायी होणार आहे.
सीएसएमटी फलाट क्र. १० आणि ११ ची लांबी ३८५ मीटरने वाढवण्यात आल्यानंतर आता लांबी ६९० मीटरपर्यंत करण्यात आली आहे. या फलाटांवरील सिग्नलसंबंधी तांत्रिक कामे करण्यासाठी ५३ मीटरचे २ विशेष पोर्टल उभारले आहेत. पॉइंट्स, सिग्नल्स, डीसी सर्किट अशी कामे करण्यासाठी २५० अत्यंत कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस-रात्र मेहनत घेतली.
सीएसएमटी आणि ठाणे रेल्वे स्थानकातील प्रमुख पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे उपनगरी प्रवासी आणि लांब पल्ल्याचे प्रवाशांना फायदा होईल. सुविधा वाढविण्याच्या प्रयत्नात मुंबईकरांच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल डॉ. स्वप्नील नीला यांनी रेल्वे प्रवाशांचे आभार मानले आहेत.