वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून जालनाला रवाना होणारी वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून रवाना न होता कल्याणहून दुपारी १.१७ ला रवाना होणार आहे. तर जालनाहून सीएसएमटीकडे येणाऱ्या वंदे भारतचा देखील प्रवास कल्याणपर्यंतच असणार आहे. वंदे भारतच्या प्रवाशांना कल्याण स्थानक गाठावे लागणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक देखील बिघडले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बनारसला रविवारी रात्री १०.४५ ला रवाना होणारी सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द झाली ती आज दुपारी ३ वाजता सुटणार आहे. तर रात्रीची ११.३५ ची पाटलीपुत्र एक्सप्रेस ही आज दुपारी १२ वाजता रवाना होणार आहे. तसेच सकाळी ६ वाजताची गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही दुपारी २ वाजता रवाना होणार आहे. सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांची मुंबई हरिद्वार एक्सप्रेस ही दुपारी १ वाजता सुटणार आहे. तर ८ वाजून ५ मिनिटांची बरेली एक्सप्रेस दुपारी ४ वाजता सुटणार आहे.
जोरदार पावसाचा एक्सप्रेस रेल्वेमार्गावर परिणाम झाल्याने सोमवार ८ जुलैच्या काही एक्सप्रेस गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस मुंबई-पुणे, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस या एक्सप्रेस आज रद्द रवाना होणार नाहीत.
यलो अलर्टच्या पाश्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांना सतर्कतेचा इशारा देणारा आहे. याव्यतिरिक्त, आज दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी समुद्रात ४.४० मीटर उंच भरती येणार असल्याचे देखील हवामान विभागाने सूचित केले आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.