Mumbai Crime : सुट्ट्यांमध्ये फिरायला जाताय? सावधगिरी बाळगा, अन्यथा पडेल भुर्दंड, घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ

प्रतिनिधी, मुंबई : उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच घरे बंद दिसली की घरफोड्या आणि चोरीच्या घटना वाढतात. रात्रीच नाही, तर दिवसाही घरफोड्या केल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरांनी अनेक घरांची चांगलीच ‘सफाई’ केली. या तीन महिन्यांत मुंबईत घरफोडीच्या ३२७, तर चोरीच्या दोन हजार ६६० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी अथवा पर्यटनाला जाताना सावधगिरी न घेतलेल्या मुंबईकरांच्या सुट्टीच्या आनंदावर विरजण पडले.मार्च महिन्यात मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्ट्या पडतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेकजण गावी तसेच अन्य ठिकाणी पर्यटनाचा बेत आखतात. घराला कुलूप लावून गेले की, आतमध्ये सर्व काही सुरक्षित असा समज असल्याने बरेचजण पैसे, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू घरातच ठेवून जातात. याचा पुरेपूर फायदा चोरटे घेतात आणि या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारतात. पोलिसांनी वारंवार दिलेल्या सूचनांकडेही दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा फटका बसतो.

Today Top 10 Headlines in Marathi: मुंबई-पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा, अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप, सकाळच्या दहा हेडलाईन्स

घरफोडीच्या काही घटना

अंधेरी : डी. एन. नगरमधील सोनाराच्या घरातून लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

चुनाभट्टी : संपूर्ण कुटुंब सातारा येथील गावी गेले असताना, घर फोडून दीड लाखांचा ऐवज चोरला.

मालाड : अमेरिकेत असलेल्या कुटुंबाचे मालाड येथील घर फोडून दोन लाखांचे दागिने, रोख लंपास

कांदिवली : निवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या घरातून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लुटला.

माहीम : अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून दागिने पळवले.

अँटॉप हिल : बंद गोडाऊन फोडून हजारो रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पंख्यांची चोरी.

मालवणी : रोख रकमेसह घरातील टीव्ही, मिक्सरवर डल्ला

सांताक्रूझ : पानाच्या दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम, पान मसाला आणि पानांची चोरी

घरफोडी आणि चोरीचे गुन्हे

महिना घरफोडी चोरी

मार्च १३१ ९४०

एप्रिल ९० ८२२

मे १०६ ८३८

जानेवारी ते मे महिन्यातील आकडेवारी

प्रकार गुन्हे उकल

घरफोडी ५४३ ३०४

चोरी ४,४५१ १,२९८

ही काळजी घ्या

सोन्याचे दागिने तसेच रोकड घरात ठेवू नये. दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत.

रात्री घराबाहेर पडताना घरातील दिवे चालू ठेवावे.

दरवाजाला कडी-कुलूप न लावता ‘लॅच’ प्रकारातील कुलपाचा वापर करावा.

शक्य असल्यास सुरक्षारक्षक नेमावा.

सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सायरनचा वापर करावा.

घर बंद करून जात असल्याची कल्पना शेजारी, सुरक्षारक्षकाला द्यावी.