आणखी मुलांची विक्री केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी शीतलची कसून चौकशी केली असता, आणखी एका मुलीची माहिती मिळाली. एजंट शरद देवर आणि स्नेहा सूर्यवंशी यांनी या मुलीची विक्री केल्याचे समोर आले. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले. दोन्ही मुलांना सांभाळ करण्यासाठी महालक्ष्मी येथील बाल आशा ट्रस्ट येथे ठेवण्यात आल्याचे रागासुधा यांनी सांगितले.
मुलांची विक्री करणारी ही टोळी मोठी असल्याचा अंदाज आल्यानंतर, उपायुक्त रागासुधा आणि दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप तेजनकर, महिला निरीक्षक भोर, दिनेश शेलार, उपनिरीक्षक शीतल पाटील, संजय भावे यांची पथके तयार करण्यात आली. चौकशीमध्ये या टोळीने मुंबईतील १४ मुलांची हैदराबाद, तेलंगण आणि आंध्र प्रदेश येथे विक्री केल्याचे उघड झाले. त्यानुसार या मुलांचा शोध घेण्यात येत आहे. वंदना, शीतल, स्नेहा, नसीमा, लता, शरद आणि डॉ. संजय यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची २ मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
आरोपींमध्ये डॉक्टरचा समावेश
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
चौदा मुलांची विक्री केल्याचे उघड
८० हजार ते चार लाखांना विक्री
ही टोळी सप्टेंबर २०२२पासून सक्रिय असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. नवजात बाळापासून दोन वर्षांपर्यंतच्या मुलांची विक्री ही टोळी करत होती. एका मुलामागे ८० हजारांपासून ते चार लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात. मूळ पालकांना ३० ते ६० हजारांची रक्कम मिळत होती. गरजू पालकांना दत्तक प्रक्रियेने मुले देत असल्याचे भासविले जात होते, असेही तपासातून पुढे आले आहे.
प्रजनन केंद्रातील बीजदात्री
अटक केलेले सर्व आरोपी कोणत्या ना कोणत्या प्रजनन केंद्राशी संबंधित आहेत. पाच महिला आरोपी तर बीजदात्री आहेत. प्रजनन केंद्रात बाळाच्या प्रयत्नात असलेली जोडपी येतात. प्रजनन केंद्रातील एजंटकडून ही माहिती मिळाल्यानंतर, या महिला आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबांचा शोध घेत, पैशांची लालूच दाखवून त्यांच्याकडून मूल खरेदी करून गरजू दाम्पत्याला देत असत, असे उघडकीस आले आहे.
दिव्यात डॉक्टरचे रुग्णालय
पोलिसांनी अटक केलेला डॉक्टर संजय हा बीएचएमएस असून त्याचे दिवा येथे स्वतःचे रुग्णालय आहे. मूळचा परभणीचा असलेल्या संजय याने वैद्यकीय शिक्षण नांदेड येथून घेतले आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून तो महिला एजंटच्या संपर्कात आला होता.