मुंबई : येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई सागरी किनारा मार्गातील विविध टप्पे वाहनचालकांच्या सेवेत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचा खटाटोप सुरू आहे. ११ जुलैपासून सागरी किनारा मार्गातील हाजी अली ते वरळी मार्गिका सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी या मार्गिकेची पाहणी केली. तर वरळी सी लिंकपर्यंतच्या विस्तारातील वांद्रेच्या दिशेने जाणारी टप्पाही १५ ऑगस्टपर्यंत खुला करण्याचा विचार आहे. त्यासाठी सागरी किनारा मार्गाची पावसातही अनेक कामे सुरू आहेत.मुंबई सागरी किनारा मार्गातील वरळी ते मरिन ड्राइव्ह असा पहिला टप्पा १२ मार्च २०२४ ला वाहनचालकांच्या सेवेत आला. पहिला टप्प्यात प्रियदर्शनी पार्क ते मरिन ड्राइव्हपर्यंत २.०७ किमी लांबीचा बोगदाही सेवेत आल्यामुळे प्रवासही सुसाट होत आहे. त्यानंतर मरिन ड्राइव्ह ते हाजी अली असा मार्गही सुरू झाला. त्यामुळे वरळी सी फेस ते मरिन ड्राईव्ह असा सध्या अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास १० ते १५ मिनिटांत होण्यास मदत मिळाली आहे. आता यामधील हाजी अली ते वरळी म्हणजेच हाजी अली पासून ते खान अब्दुल गफार खान मार्गे सी लिंक दरम्यानची सुमारे साडे तीन किमी अंतराची उत्तर मार्गिका सेवेत येणार असून त्यासाठी ११ जुलैचा मुहूर्त काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सागरी किनारा मार्गातील आंतरमार्गिका, रस्ते, पदपथ आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत. हा प्रकल्प वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्यासाठी दोन तुळई स्थापनही करण्यात आले असून त्याचे कामही सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली.
सागरी मार्ग-सी लिंक जोडण्यासही वेग
सागरी किनारा मार्ग आणि सी लिंक २६ एप्रिल २०२४ मध्ये पहिल्या महाकाय तुळईने (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) जोडण्याचा टप्पा पार केला होता. त्यानंतर १५ मे रोजी मोठी दुसरी तुळईही बसवण्यात आली. सागरी किनारा मार्गाच्या दक्षिण बाजूकडील या जोडणीमुळे सागरी किनारा मार्ग आणि सी लिंक एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत. त्यामुळे ही कामेही पूर्ण करण्यासाठी बराच खटाटोप सुरू असून या विस्तारातील वांद्रे ते मरिन ड्राइव्हच्या दिशेने जाणारी मार्गिका १५ ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये वाहनांना ये-जा करण्यासाठी दोन मार्गिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचबरोबरच सी लिंक विस्तारातील उत्तरेकडील म्हणजेच मरिन ड्राइव्ह ते वांद्रे दिशेनेही आणखी एक तुळई जोडण्याचे काम केले जाणार आहे. हे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले जाणार असून त्यामुळे संपूर्ण मार्ग खुला होणार आहे.