ठाणे स्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक मंजूर झाला आहे. साधारणपणे फलाट रुंदीकरणासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. अडीच दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी मॉड्यूलर फलाट उभारण्यात येणार आहे. यासाठी ४४ ओव्हरहेड वायरला आधार देणारे खांब योग्य ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पहिल्या बारा ते पंधरा तासांत रुळ सरकवण्याची कामे करण्यात येतील. त्यानंतर ७२५ प्री-कास्ट बॉक्सच्या मदतीने मॉड्यूलर फलाट उभारण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील खासगी कार्यालये-आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा पर्याय देण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात आली आहे. बेस्ट आणि राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला ब्लॉक वेळेत अतिरिक्त गाड्या चालवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असेल तरच प्रवासासाठी बाहेर पडावे, शक्य असल्यास ब्लॉक वेळेत प्रवास टाळावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील निला यांनी सांगितले.
ठाण्यात ६३ तासांचा ब्लॉक (डाउन जलद)
स्थानक – कळवा ते ठाणे
मार्ग – अप-डाऊन धीमा, अप जलद
वेळ – ३१ मे रोजी रात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०
परिणाम – डाऊन जलद मार्गावरील लोकल/मेल/एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.
सीएसएमटीत ३६ तासांचा ब्लॉक
स्थानक – सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड
मार्ग – अप-डाऊन जलद, अप-डाऊन धीम्या, यार्ड मार्गिका
वेळ – १ जून मध्यरात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०
परिणाम – सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
ब्लॉकमुळे रद्द असलेल्या लोकल फेऱ्या
दिवस – रद्द लोकल – रद्द मेल/एक्स्प्रेस
पहिला दिवस (शुक्रवार) – १८७ / ४
दुसरा दिवस (शनिवार) – ५३४ / ३७
तिसरा दिवस (रविवार) – २३५ / ३१
एकूण – ९५६ / ७२