Mumbai Airport: मुंबईत धक्कादायक प्रकार, एकाच धावपट्टीवर दोन विमाने, मोठा अनर्थ टळला; Video

प्रतिनिधी, मुंबई : उड्डाण करणाऱ्या विमानाने धावपट्टी ओलांडण्याआधीच दुसरे विमान त्याच धावपट्टीवर उतरल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर शनिवारी घडला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, हवाई वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (एटीसी) संबंधित अधिकाऱ्याला त्या कामातून मुक्त करतानाच सखोल चौकशी सुरू केली आहे.मुंबई विमानतळावर विमानांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. सध्या विमानतळावर केवळ ‘आरडब्ल्यू२७’ या एकाच धावपट्टीवरून विमानांची ये-जा होत आहे. दररोज ८५०पेक्षा अधिक विमानांची ये-जा या विमानतळावरून होत असल्याने विमानांचे नियंत्रण करणे ‘एटीसी’साठी आव्हानात्मक ठरते. शनिवारी तिरुअनंतपुरमकडे जाणारे ‘एअर इंडिया’चे विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच काही सेकंदांमध्येच इंदूरहून आलेले ‘इंडिगो’चे विमान त्याच धावपट्टीवर उतरले. ‘एअर इंडिया’च्या विमानाने उड्डाण करताना धावपट्टी पूर्णपणे सोडलेली नसताना आणि त्या धावपट्टीशी प्रत्यक्ष संपर्क तुटण्यापूर्वीच ‘इंडिगो’चे विमान जवळपास धावपट्टीवर उतरले होते. या दोन्ही विमानांमध्ये केवळ काही मीटर अंतर होते. या घटनेचा व्हिडिओ रविवारी समाजमाध्यमांवर वेगाने पसरला. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून ‘एक्स’वर अनेकांनी तीव्र आश्चर्याबरोबरच संतापही व्यक्त केला.

अंतर्गत विरोधानंतरही संधीचं सोनं, मोदींच्या ‘गुडबुक’मधील खासदार, रक्षा ताईंनी विरोधकांना अस्मान दाखवले

‘एटीसी’ने दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि धावपट्टी मोकळी असल्याचे सांगितल्याप्रमाणेच आमच्या ६ई-६०५३ या विमानाच्या वैमानिकाने धावपट्टीवर उतरण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची आम्ही नियमाप्रमाणे संबंधित यंत्रणेला माहिती दिली आहे,’ असे ‘इंडिगो’ने आपल्या पत्रकात स्पष्ट केले. ‘आम्ही यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्याला त्या कामापासून दूर केले असून, चौकशी सुरू केली आहे,’ असे ‘डीजीसीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘ठरलेल्या निकषांनुसार, एटीसीला तीन मिनिटांत दोन विमानांचे उड्डाण व दोन विमाने उतरविण्यास परवानगी देता येते. जेव्हा दृश्यमानता चांगली असते तेव्हा दोन विमानांतील वेळेचे अंतर कमी करता येते. परंतु, जेव्हा विमान वाहतुकीची घनता खूप जास्त असते तेव्हा एटीसीवर खूप ताण असतो. अशा स्थितीतही सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन झाले की नाही, याची तपासणी डीजीसीए करील; तसेच ‘एअर इंडिया’ व ‘इंडिगो’ या दोन्ही विमान कंपन्यांनी या प्रकाराबद्दल आपापल्या परीने चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.