पाईपलाइन टाकण्याचे काम सुरु असताना खचला रस्ता
मुंबईसह विरार परिसरात सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पहिल्याच पावसात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खचला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वसई हद्दीताल मालजीपाडा परिसरात जे.के. टायर शोरूमजवळ महामार्गाचा रस्ता खचल्याची ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. रस्त्याच्या बाजूला पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला आहे. परिणामी रस्त्यावरून जात असलेल्या काही अवजड वाहनांची चाके खचलेल्या रस्त्यातच अडकली आहेत.
नायगाव-भाईंदर दरम्यान दोन्ही मार्गिकेच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नायगाव-भाईंदर दरम्यान दोन्ही मार्गिकेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर रस्त्यात अडकलेल्या या अवजड वाहनांना बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हवामान विभागाने वर्तवला मुसळधार पावसाचा अंदाज
तत्पूर्वी, राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यातच मुंबईसह महानगर प्रदेशात सकाळपासूनत पावसाने हजेरी लावली. यादरम्यान अनेक ठिकाणी पावसाचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.