यावर्षी राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे, या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे. यावर्षी राज्यात पडणाऱ्या मान्सूनसंदर्भात स्कायमेटकडून पहिला पू्र्व अंदाज जारी करण्यात आला आहे.स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ गतीनं होईल. जूनमध्ये मान्सूनचं आगमन होईल, मात्र तो संथ गतीने पुढं सरकरणार आहे. मात्र त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा देशभरात पावसाचं प्रमाण सामान्य राहणार असून, 103 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो असं स्काय मेटनं म्हटलं आहे.
याबाबत माहिती देताना स्काय मेटच्या तज्ज्ञांनी सांगितलं की, ला लीनाची स्थिती बदलली आहे, मात्र तरी देखील यावेळी देशात मान्सून सामान्य स्थितीमध्ये राहणार आहे, यावेळी देशभरात सरासरीच्या 103 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक जून ते तीस सप्टेंबर या काळात देशभरात 895 मिमी इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज 40 टक्के इतका आहे, तर सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता 30 टक्के असून, अतिवृष्टीची शक्यता दहा टक्के इतकी आहे.
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी 158.7 मीमी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक 286.1 मीमी इतक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात 275.3 मिमी तर सप्टेंबर महिन्यामध्ये 174.6 मिमीटर पाऊस पडू शकतो.
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आसाम, अरुणाचल प्रदेश, आणि जम्मू -काश्मीरमध्ये यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर्षी पाऊस चांगला पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात देखील यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे.