प्रतिनिधी, पुणे : दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केले. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगलीचा बहुतांश भाग; तसेच रत्नागिरी, सातारा, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांच्या काही भागांत मान्सूनने गुरुवारी प्रवेश केला. मान्सून प्रगतीची उत्तरसीमा सध्या रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथून जात आहे. हवामान अनुकूल असल्याने पुढील तीन-चार दिवसांत मान्सून मुंबई, पुण्यासह राज्याच्या आणखी काही भागांत पोचण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.गेले काही दिवस गोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. या भागावरील ढगांची दाटी; तसेच वातावरणात विरुद्ध दिशांनी असलेला वाऱ्यांचा प्रवाह-शिअर झोन सध्या १६ अक्षांशांवर असल्याने मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे आयएमडीने जाहीर केले. यंदा केरळमध्ये सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस आधी म्हणजे ३० मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्यापुढेही हवामान अनुकूल राहिल्याने पश्चिम किनारपट्टीवरून मॉन्सून पुढे सरकत राहिला. आता सर्वसाधारण तारखेच्या एक दिवस आधी मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल झाला आहे.
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सात ते १५ जून या कालावधीत मॉन्सूनची प्रगती होत असते. मान्सूनचे आगमन होत असताना कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सात ते ११ जूनपर्यंत अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. या काळात किनारपट्टी आणि घाट क्षेत्रात काही ठिकाणी मुसळधार सरींचीही शक्यता असल्याचे अंदाजात म्हटले आहे.