Monsoon 2024: यंदा धो-धो बरसणार! सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता; काय सांगतो IMDचा अंदाज? कुठे किती पाऊस?

प्रतिनिधी, पुणे : प्रशांत महासागरात ‘ला निना’ विकसित होण्याचे स्पष्ट संकेत दिसत असल्याने जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. या आधी एप्रिलमधील अंदाजातही आयएमडीने सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. महाराष्ट्रातही मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.

हंगामाच्या विभागनिहाय अंदाजानुसार, यंदा महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. मेपर्यंतच्या हवामानाच्या नोंदी गृहीत धरून देण्यात येणारा मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील हंगामी अंदाज ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी जाहीर केला.

डॉ. महापात्रा म्हणाले, ‘यंदा मान्सून हंगामातील पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के (त्रुटी कमी- अधिक चार टक्के) राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पावसाची १९७१ ते २०२० या काळातील राष्ट्रीय सरासरी ८७० मिलिमीटर आहे. जम्मू- काश्मीर, लडाख, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग वगळता देशात इतरत्र पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असेल.’

जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस

जून महिन्यात देशभरात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण (महिन्याच्या सरासरीच्या ९२ ते १०८ टक्के) राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारताच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त, तर उत्तर भारत आणि मैदानी क्षेत्रामध्ये जूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जूनच्या पावसाची राष्ट्रीय सरासरी १६५.४ मिलिमीटर आहे.
धरणे आटली, चिंता दाटली! नाशिक जिल्ह्यातील नऊ प्रकल्प कोरडेठाक, कोणत्या धरणात किती पाणी?
राज्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन?

रेमल चक्रीवादळाची तीव्रता सोमवारी कमी झाली असून, पुढील दोन दिवसांत वादळाचा प्रभाव ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सुरळीत होऊन येत्या पाच दिवसांत मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या विस्तारित अंदाजानुसार, मान्सूनच्या केरळमधील आगमनानंतर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सक्रिय राहणार असून, सहा ते १३ मे या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रापर्यंत दाखल होऊ शकतो.

‘ला निना’, ‘पॉझिटिव्ह आयओडी’चे संकेत

प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव ओसरून तिथे मान्सूनच्या सुरुवातीला न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या उत्तरार्धात ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता जास्त असून, त्याचा मान्सूनकाळातील पर्जन्यमानावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. इंडियन ओशन डायपोलही (आयओडी) मान्सून काळात पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता असल्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.

कुठे किती पाऊस?

– मध्य आणि दक्षिण भारत – सरासरीपेक्षा जास्त,
– वायव्य भारत – सर्वसाधारण
– ईशान्य भारत- सरासरीपेक्षा कमी
– मध्य भारत – सरासरीपेक्षा जास्त

हंगामी पावसाचा अंदाज
पावसाचे प्रमाण————————————————–यंदाची शक्यता (टक्क्यांमध्ये)
अपुरा पाऊस (सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी)——————- २
सरासरीपेक्षा कमी पाऊस (सरासरीच्या ९० ते ९५ टक्के)———– ८
सर्वसाधारण पाऊस (सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के)—————- ३१
सरासरीपेक्षा जास्त पाऊस (सरासरीच्या १०५ ते ११० टक्के)——– ३२
अतिरिक्त पाऊस (सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त)————- २९