मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले  आमचे विचार…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तब्बल दीड तास राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचे कारण काय, याबद्दल भाष्य केले.

आज खरं म्हणजे राज ठाकरेंनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यासाठी मी आलो होतो. गेले काही दिवसांपासून निवडणुका झाल्यानंतर एक दोन महिन्यांपासून भेटायचं, जेवायला या, एकत्र जेवूया आणि गप्पा मारुया असं आमचं सुरु होतं. त्यामुळे मी आज आलो. ही सदिच्छा भेट होती. स्नेहभोजनही झालं. गप्पा गोष्टी झाल्या.

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळाही दिला. बाळासाहेबांचे अनुभव, राज साहेबांचे अनुभव. आम्ही बाळासाहेबांसोबत एकत्र काम केलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या. अनेक बाळासाहेबांच्या जुन्या घटनांवर बरीच चर्चा आणि गप्पा झाल्या. अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला हेच कळलं नाही. ही सदिच्छा भेट होती. याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही.

आज सकाळी मी सिमेंट क्राँकीटचे रस्ते पाहिले, त्याबद्दलही राज ठाकरेंनी विचारणा केली. सरकारचं काम कसं चाललंय, मुंबईतील रस्त्यांची काम कशी चालली आहेत याबद्दलही विचारले. अनेक विकासकामांबद्दलही चर्चा झाली. पण राजकीय चर्चा कोणतीच झाली नाही. गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये आमचा एवढा वेळ कसा गेला हे कळलं नाही. ही वस्तूस्थिती आहे.

तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे नेते आहोत. आम्ही मनात एक पोटात एक ओठात एक ठेवणारे लोक नाही. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्या काळात राज ठाकरे आणि मी कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)