लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी बैठका आतापासूनच सुरु केल्या असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता यासाठी मिशन महाराष्ट्र हाती घेतले आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विशेष मेळावा १३ जून रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात पक्षातील अंतर्गत निवडणुका होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. तर त्याचवेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही महत्त्वपूर्ण ठराव या मेळाव्यात मांडण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्रभरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याला हजर राहण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. राजकीय वर्तुळात हा पाठिंबा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला होता. हा पाठिंबा जाहीर करतानाच त्यांनी विधानसभेसाठी लवकरच भुमिका जाहीर करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. याबाबत उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेली असतानाच पक्षाने विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतली. या सर्व राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे १२ जूनला होणाऱ्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या सर्व राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे १२ जून रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात पक्षाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून पक्षातील अंतर्गत निवडणुकाही यावेळी घेतल्या जाणार असल्याची माहिती पक्षातील एका बड्या नेत्याने दिली. त्याचवेळी विधानसभेसाठी पक्षाच्या रणनितीसाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून त्यानुसार अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव या मेळाव्यात मंजूर करण्यात येणार असल्याचे कळते. या मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता असून लोकसभा निवडणुकांच्या निकालावर विचारमंथन केले जाणार असल्याचे कळते.
मुंबईतील प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकी दरम्यान ज्या ज्या मतदारसंघात सभा घेतली होती. त्यातील अनेक मतदारसंघात महायुतीला फायदा झाल्याचे दिसून आले. मात्र मुंबईतील मतदारसंघात त्याचा म्हणावा तितका परिणाम झाला नसल्याचे निकालाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. त्यामुळे याबाबतही या मेळाव्याच्या निमित्ताने चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईप्रमाणेच पुणे, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघावर यावेळी लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे कळते.
नाराज पदाधिकाऱ्यांवर नजरा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्शविलेला पाठिंबा आणि त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत घेतलेली माघार यामुळे पक्षातील काही पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या मेळाव्यात या नाराज पदाधिकाऱ्यांवर साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यात काही प्रमुख नेत्यांवर विशेष नजरा असणार आहेत.