MNS : हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेनं ठरवलं, आर-पार, ‘टोकाला जाईपर्यंत संघर्ष’,

हिंदी भाषा शिकणं बंधनकारक करण्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. “आज हिंदी शिकणं बंधनकारक करत आहात. उद्या बोलाल गुजराती भाषा शिका, परवा बोलाल तामिळ शिका, असं होत नाही, आम्ही आमच्या राज्याची भाषा शिकू. दुसऱ्या राज्याची भाषा आम्ही का शिकायची? हे बंधनकारक करण्याला आमचा विरोध आहे” असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

हिंदी भाषेचा निर्णय लागू झाल्यास आपली भूमिका काय असेल? ‘संघर्ष होईल, मराठीत सांगतो टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल’ असं संदीप देशपांडे म्हणाले. “सध्या कोणाला उद्योग नाहीयत, काम नाहीयत. त्यामुळे ते अशा गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत” असं अजित पवार म्हणाले. त्यावर संदीप देशपांडे म्हणाले की, “जर अजित पवारांना हिंदी राष्ट्रभाषा वाटत असेल, तर त्यांनी पहिलीपासून धडे घ्यावेत. त्यांना पुन्हा शाळेत पाठवा”

एक देश, एक भाषा कॉन्सेप्ट आली कुठून?

मुख्यमंत्री म्हणाले मराठी भाषा अनिवार्य आहेच, पण हिंदी कम्युनिकेशनच्या दुष्टीने आली पाहिजे. “गरज काय आहे? एक देश, एक भाषा कॉन्सेप्ट आली कुठून? आधीपासून भारतात इतक्या भाषा बोलल्या जात आहेत, आत्ताच गरज काय आहे?. तुमची भाषा तामिळनाडूत समजावी, म्हणून हिंदी आवश्यक नाही” असं संदीप देशापांडे यांनी सांगितलं.

ती विविधता तोडायला निघाला आहात

संवाद व्यवस्थेसाठी सांघिक भाषा असावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर “आपल्या जनगणमन मध्ये म्हटलं आहे, पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा या सर्व गोष्टी एक आल्यावर भारत होतो, मग एक देश, एक भाषा कॉन्सेप्ट आली कुठून?. विविधतेत एकता आहे ना, मग तुम्ही ती विविधता तोडायला निघाला आहात” असं संदीप देशपांडे म्हणाले. घाटकोपरमधील मराठी विरुद्ध गुजराती वादावर म्हणाले की, जिथे मराठीवर अन्याय, तिथे आमची लाथ पडेल.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)