महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यात महाकुंभ, नदी प्रदूषण या विषयावर सविस्तरपणे बोलले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते, माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरने दादरमध्ये मनसेला डिवचणारे पोस्टर लावले. त्यावरुन महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले आहेत. “बाल बुद्धी जो बाबू आहे, समाधान सरवणकर तो कोण आहे? हा जो एक बाल बुद्धी आहे, त्याचं शिक्षण कमी आहे, वैचारिक पातळीच कमी आहे, अशा या बाल बुद्धीने आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावला आहे. त्याला नंतर वरुन दम मिळणार आहे, त्याने चुकीच होर्डिंग लावलं आहे” अशा शब्दात मनसे नेते संतोष धुरी यांनी समाचार घेतला.
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सुद्धा समाधान सरवणकरचा समाचार घेतला. “शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेमध्ये येणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये हिंदुत्व म्हणजे काय आहे? असे बॅनर लावून त्यांना काय साध्य करायचे आहे?” असा सवाल त्यांनी केला. “प्रश्न एकनाथ शिंदेंना आहे अशा पद्धतीने जर तुमच्या पक्षाचा एक कार्यकर्ता नेता बॅनर लावत असेल तर त्याला तुमची मान्यता आहे का? नरेश म्हस्के यांच्या सभेसाठी आणि श्रीकांत शिंदेंचे सभेसाठी स्वतः राज ठाकरेंना तुम्ही बोलावलं म्हणून आम्ही आलो, तुमचे उमेदवार विजयी झाले” याची आठवण अविनाथ अभ्यंकर यांनी करुन दिली.
अर्थ समजून घेणं अत्यंत गरजेचं
“आता अशा प्रकारचे बॅनर लावण्याची गरज काय? हिंदुंबद्दल राज ठाकरेंनी ही भूमिका मांडलेली आहे, यांना जर ती भूमिका समजत नसेल तर यात त्यांचा दोष आहे” असं अभ्यंकर म्हणाले. “आशय विषय आणि अर्थ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण शिवसेनेच्या नेत्यांनाही समजत नाही असच दिसतं आहे” असं अविनाश अभ्यंकर म्हणाले.
म्हणून मुलगा हरला
“माझ्या बापाचं कर्तुत्व आहे, म्हणून मी नगरसेवक तरी झालो त्यांचं कर्तुत्व नाही म्हणून मुलगा हरला” अशी टीका समाधान सरवणकरने केली. “144 वर्षांनी महाकुंभचा योग आलेला. हिंदू एकजूट झालेला जेव्हा हिंदू एकजूट होते, तेव्हा त्यांना टार्गेट केलं जातं. हिंदुंबद्दल अप्रचार केला जातो, हिंदू दुखावले जातात यात विघ्न आणण्याचे काम काही नेते करतात” अशी टीका समाधान सरवणकर यांनी केली.