मराठी खासदार तोंडात लाचारीचा बोळा घेऊन…  मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुन्हा मनसे आक्रमक, बॅनरने वेधलं लक्ष

गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीय नेत्यांनी मनसेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. याविरोधात उत्तर भारतीय नेते रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी मुंबईत एक बॅनर लावला होता. या बॅनरद्वारे महाराष्ट्रातील 48 मराठी खासदारांवर उपरोधिक टीका करण्यात आली होती. मात्र आता हे बॅनर हटवण्यात आले आहे.

मनसेच्या बॅनरवर काय?

मुंबईतील दादर पोर्तुगीज चर्च परिसरात एक बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर महाराष्ट्रातील 48 मराठी खासदारांवर उपरोधिक टीका करण्यात आली. “मराठी माणसासाठी आणि मराठी स्वाभिमानासाठी रक्ताचे पाणी करून पक्ष काढतो, मराठी भाषेसाठी झटतो. मराठी प्रश्नांसाठी शेकडो पोलीस केस अंगावर घेतो, ते म्हणजे राज ठाकरे आहेत. मात्र त्याच व्यक्तीच्या पक्षावर बंदी घाला असे संसदेत परराज्याचा खासदार मागणी करतो, तेव्हा तिथे बसलेल्या 48 मराठी खासदारांचा स्वाभिमान, मराठी बाणा, कणा मोडलेला आहे हे सिद्ध झाले.. एक भय्या खासदार बोलत होता आणि तुम्ही मराठी खासदार तोंडात लाचारीचा बोळा घेऊन गुलामांसारखे शांत ऐकून घेत बसला होतात, धिक्कार असो तुमचा… यांना मराठी खासदार म्हणायचं नाही तर यांना कणा नसलेले खासदार म्हणायचं…” असे यावर नमूद करण्यात आले होते.

MNS Raj thackeray

मराठी भाषा शिकण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

मात्र, आज सकाळी मनसेने लावलेले हे बॅनर हटवण्यात आले असून त्या ठिकाणी केवळ बॅनरची फ्रेम शिल्लक आहे. तर दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी आज मराठी भाषा शिकण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्याचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहे.

राजकीय वातावरण अधिक तापण्याची

उत्तर भारतीय नेते आणि मनसे यांच्यातील मराठी बॅनरवरूनचा वाद वाढत असताना, मनसेने हे बॅनर का काढले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्या ठिकाणी हे बॅनर लावले होते आणि आता ते काढले आहे. हे बॅनर काढण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)