राष्ट्रवादीचे माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना धमकीचे ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांचे वडील माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गेल्यावर्षी कुख्यात बिश्नोई टोळीच्या गुंडांनी हत्या केली होती. त्यानंतर त्यांचे पूत्र झिशान यांना संरक्षण देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता त्यांना धमक्या आल्याने खळबळ उडाली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.त्यामुळे पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. झिशान सिद्दीकी यांना ईमेलवरुन जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डी कंपनीच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी आल्यानंतर, पोलिसांचे पथक झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
बाबा सिद्दिकी यांची हत्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील खेरवाडी येथील त्यांच्या कार्यालयासमोरच शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत हत्या केली होती. त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयात ते जात होते. तेव्हा खेरवाडी सिग्नलजवळ बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून गोळीबार करीत त्यांची हत्या केली होती.