मंत्री सावकारे, योगेश कदम यांना घरचा आहेर, शिवसेनेतील या बड्या नेत्याने सुनावले

संजय सावकारे, योगेश कदमImage Credit source: TV 9 Marathi

BJP and Shivsena Minister Controversial Statement On Swargate Rape Case : पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर 25 फेब्रुवारी रोजी एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला आहे. परंतु त्याचवेळी सत्ताधारी मंत्र्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहे. गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी पीडित तरुणी ओरडली का नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. देशात अशा घटना घडत असतात. कारवाई सातत्याने चालूच असते, असे सावकारे यांनी म्हटले होते. त्यावर शिवसेना नेते व माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दोन्ही मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांना चार खडे बोल सुनावले आहे.

शहाजी बापू काय म्हणाले?

शहाजी बापू पाटील म्हणाले, मंत्री संजय सावकारे यांचे विधान आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. कोणतीही महिला ही कोणाचीतरी माता आहे. बहीण अन् मुलगी आहे. या सृष्टीची तारणहार तीच आहे. सर्व महिलांविषयी सर्वांनी आदर बाळगला पाहिजे, असे विधान करणे गैर असल्याचे मत शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले.

योगेश कदम यांचे विधान आश्चर्यकारक

मंत्री योगेश कदम यांचे विधान आश्चर्यकारक आहे. परंतु योगेश कदम हे तरुण मंत्री आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बोलले असतील. परंतु घटनास्थळी काहीच दंगा झाला नाही, असे म्हणण्यापेक्षा त्या मुलीवर आरोपीने प्रचंड दबाव टाकून अत्याचार केला असेल, हे समजणे गरजेचे आहे. अत्याचारापेक्षा कुठलीही मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्राधान्य देणार हे निश्चित आहे. त्यामुळे तिने त्या ठिकाणी आरडाओरड केली नसेल. मंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. पण या प्रकरणात ते आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे.

राजकारणात संबंध कोणाचे कोणाशिही असू शकतात सुरेश धस आणि वाल्मीक कराडचे संबंध असू शकतात परंतु वाल्मीक कराडच्या घाणेरड्या कृत्यांना सुरेश धस यांचा पाठिंबा असेल असे आपण म्हणू शकत नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांचा आहे. ते निश्चितपणे योग्य वेळी तो निर्णय घेतील, असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)