Microsoft Down: मायक्रोसॉफ्टच्या मंदीत नेटकऱ्यांनी साधली मिम्सची संधी; सोशल मीडियावर विनोदांना उधाण

मुंबई : जगातल्या अनेक देशांच्या तंत्रसज्जतेच्या दाव्यांची विमाने शब्दश: जमिनीवर उतरायला लावणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या जागतिक क्रॅशमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र मायक्रोसॉफ्टच्या या मंदीतही नेटकऱ्यांनी संधी साधत मीम्सची मजा लुटली. मायक्रोसॉफ्टक्रॅश आणि ब्लूस्क्रीन या हॅशटॅगसह हे मिम्स ‘एक्स’ या सोशल मीडिया ॲपवर प्रचंड व्हायरल झाले.

शुक्रवारी वीकेंडच्या मूडमध्ये ऑफिसमध्ये पोहोचलेल्या अनेकांचे लॅपटॉप, डेस्कटॉप हळुहळू ‘निळे’ होत गेले आणि एकमेकांना ‘सर्व्हर डाउन आहे का,’ ‘आयटीला फोन केला का,’ अशी विचारणा सुरू झाली. थोड्या वेळाने हा फक्त आपल्याच ऑफिसमधला प्रकार नसून संपूर्ण जगभरात विविध क्षेत्रांमध्ये मायक्रोसॉफ्टची उपकरणे काम करणे बंद झाल्याचे समोर आले. आपल्या लॅपटॉपचे निळे झालेले तोंड हे फक्त आपल्यापुरतेच नाही, तर संपूर्ण जगभरातील अनेकविध सिस्टिमची तोंडे निळी झाली आहेत, हे कळल्यावर सुरुवातीला तणावाखाली असलेल्या लाखो लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांच्या कल्पकतेला इंटरनेटवर बहर आला.

मिम्स आणि बॉलिवूड यांचे नाते काही वेगळेच आहे. त्यातही ‘हेराफेरी’ हा तर मिमकर्त्यांचा आवडता चित्रपट. मायक्रोसॉफ्टच्या गोंधळातही चाहत्यांनी हेराफेरी चित्रपटातील अनेक संवादांचा आधार घेतला. जगभरातील विविध कंपन्यांचे कर्मचारी शुक्रवारी लवकर घरी निघायला मिळाल्यावर ‘ये सही प्लॅन है’ म्हणत आनंद साजरा करत असतील, अशा आशयाची मिम्स व्हायरल झाली. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी ‘ये सही मीम है’ असं म्हणत दाद दिली. अक्षय कुमारच्या मोठ्या पडद्यावरील अनेक प्रतिक्रियांचा आधार घेत याआधी मिम्स झाली होती. या मायक्रोसॉफ्ट गोंधळात नेटकऱ्यांना अक्षय कुमार आठवला नसता, तरच नवल. त्याशिवाय ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधील काही फ्रेमचा आधार घेत मिम्स तयार झाली. त्यावर कमेंट करताना अनेकांनी ‘सही पकडे है’ या डायलॉगचा आधार घेतला.

Microsoft Windows Server Down: मायक्रोसॉफ्टमुळे शेअर बाजारातही हाहाकार! ऑनलाइन ब्रोकरेज हाउसेस प्रभावित, गुंतवणूकदारांना धक्का
या मिम्सवर ‘लिनक्स’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ या दोन कंपन्यांमधील छुप्या स्पर्धेचेही सावट होते. लिनक्स प्रणाली असलेले लोक आत्ता कसे असतील, यासाठी ‘मिस्टर बिन’ या विनोदी पात्राच्या काही प्रहसनांमधील क्लिप व्हायरल झाल्या होत्या. तसेच मायक्रोसॉफ्ट आणि लिनक्स यांच्यातील संवादाची मिमही चर्चेत होती. त्यावर कमेंट करताना अनेकांनी मायक्रोसॉफ्टपेक्षा इतर प्रणाली कशा चांगल्या आहेत, याचे कौतुकही सुरू केले होते. त्यावर उत्तर म्हणून मायक्रोसॉफ्टचे चाहतेही पुढे सरसावले होते.

दुपारी उशिरापर्यंत हळुहळू अनेक कंपन्यांचे कामकाज सुरळीत सुरू झाले. पण तोपर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची सवलतही दिली होती. जे कामावर थांबले होते, त्यांच्या लॅपटॉपची निळी स्क्रीन पुन्हा जिवंत झाली आणि मिम्सच्या जगातून बाहेर येत नेटकरी कामाला लागले.