MHADA Lottery : पुणेकरांनी फिरवली म्हाडा लॉटरीकडे पाठ; मुदतवाढीनंतरही अल्पप्रतिसाद,’हे’ आहे नेमके कारण

प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीला अल्पप्रतिसाद मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे अर्ज सादर करण्याची मुदत वाढवल्यानंतरही नागरिकांचा या घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील ४८७७ घरांसाठी आतापर्यंत केवळ १९,५६६ जणांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. या घरांसाठी ३० मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.पुणे मंडळाने सोडत जाहीर केल्यानंतर आठ मार्चपासून घरांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. मात्र, या कालावधीत केवळ १६ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे अर्ज करण्यासाठी ३० मे रोजी रात्री बारावाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविण्यात आली आहे.

Pune News : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार्जिंग स्टेशन उभारणीस गती, ‘या’ ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन
आतापर्यंत केवळ ३८ हजार ५४५ नागरिकांनी सोडतीसाठी नोंदणी केली आहे. त्यातील १९ हजार ५६६ जणांनी पैसे भरले आहेत. ही सोडत नवीन संगणकप्रणालीनुसार होत आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या सदनिकेसाठी नोंदणी करता येत असली, तरी नवीन प्रक्रिया किचकट असल्याने अर्ज भरताना गोंधळ उडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

येथे करा ऑनलाइन अर्ज

– ‘म्हाडा’च्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

– ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनेसाठी https://housing.mhada.gov.in/landing या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन ‘म्हाडा, पुणे’ मंडळाकडून करण्यात आले आहे.

४८७७

‘म्हाडा’च्या सोडतीतील घरे

१९,५६६

सोडतीसाठी आलेले अर्ज