राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन वारंवार माझ्याबाबत फेकाफेकी करत असतात, कोट्यवधीची मालमत्ता गिरीश महाजन यांच्याकडे कशी आली? महाजन हे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते, एका शिक्षकाचा मुलगा आणि एवढी संपत्ती कुठून आली? असा सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन वारंवार माझ्याबाबत फेकाफेकी करत असतात. मागच्या वेळेसही गिरीश महाजन म्हणत होते की कोथळीची ग्रामपंचायत खडसेंची नाही म्हणून, पण त्यांना सांगायचं आहे की गेल्या 37 वर्षांपासून कोथळीची ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. मंदाकिनी खडसे या जेलमध्ये जाणार होत्या, पण मी त्यांना वाचवलं असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं. मला जामीन मिळाला तो सुप्रीम कोर्टातून मिळाला, मग महाजन एवढे का फेकत आहेत? असा टोला यावेळी खडसे यांनी महाजन यांना लगावला. मला आणि माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले, असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोट्यवधीची मालमत्ता गिरीश महाजन यांच्याकडे कुठून आली? महाजन हे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते, ते एका शिक्षकाचा मुलगा आहेत, मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? मी सात वर्षांचा होतो तेव्हापासूनच माझ्या नावावर शंभर एकर जमीन आहे, असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं.
दरम्यान धरणात जमीन जाणार आहे, या हेतून गिरीश महाजन यांनी जमीन विकत घेऊन 15 कोटी हडप केले. त्यावेळी मंत्री असताना महाजन यांनी पदाचा दुरुपयोग केला, असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.
इंदूर- हैदराबाद महामार्ग प्रकल्पामध्ये खडसेंची जमीन जाणार आहे, यावर प्रतिक्रिया देताना खडसेंनी जमीन आताच घेतली, मोबदला मिळावा यासाठी ही जमीन घेतली असा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता, या आरोपांना उत्तर देताना खडसे बोलत होते.