‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठीची अर्ज प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील महिला त्याचा लाभ घेतांना दिसत आहेत. जर तुम्ही सुद्धा अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अद्यापही मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकणार आहात. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच वर्षाला 18000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.
योजनेत पाच महत्वाचे बदल
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पाच महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तसेच त्याबाबतचा जीआर देखील राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे. यासाठी राज्य सरकारने आधीच अनेक अटी आणि शर्ती यांच्यामध्ये बदल केला आहे.
पाच बदल कोणते ?
1) पहिला बदल हा रेशन कार्ड संदर्भातील आहे. नवविवाहित महिलेचे रेशन कार्डवर तात्काळ नाव लागत नाही. त्यामुळे अशा महिलांना सध्या अर्ज करण्यासाठी अडचण होत आहे. त्यामुळे आता नवविवाहित महिलांचे विवाह नोंदणीपत्र किंवा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
2) ज्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास करणाऱ्या पुरुषांशी विवाह केला आहे. किंवा ज्या महिलांचा परराज्यात जन्म झाला आहे. अशा महिलांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच या शिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड आणि मतदानकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे.
3) लाभार्थी महिलांचे इतर बँकांप्रमाणे पोस्ट बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे.
4) ऑफलाईन अर्जावर असणाऱ्या लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
5) बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सांगण्यात आले आहे.