‘महाराष्ट्रातील जनतेची राजकारणाविषयी समज उच्च दर्जाची असून देशाच्या राजकारणाचा पाया या राज्याने नेहमीच बळकट केला आहे. राज्यात महाविकास आघाडीबद्दल कमालीची सहानुभूती असून पक्षफोडीबद्दल समाजात कमालीची नाराजी आहे’, असे निरीक्षण चेन्नीतला यांनी नोंदविले. ‘केंद्रीय यंत्रणा मागे लावून नेत्यांवर दबाव टाकता येतो, पण जनता त्याचे उत्तर देतेच, याची प्रचिती आम्हाला कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान आली’, असेही चेन्नीतला यांनी आवर्जून सांगितले. राज्यातही मविआला अनुकूल वातावरण असून ४८ पैकी ३५ हून अधिक जागा आम्ही जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘देशात आणि राज्यात इतके प्रश्न असूनही नरेंद्र मोदी भारत-पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम याविषयांवर प्रचार करत आहेत. परंतु, गेल्या १० वर्षांत त्यांनी काय काम केले, पुढे काय करणार आहेत, याविषयी चकार शब्द काढत नाहीत’, असे ते म्हणाले. ‘देशात चार टप्प्यांचे मतदान झाले असून महाविकास आघाडीची कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळेच पंतप्रधान कमालीचे वैफल्यग्रस्त झाले असून महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा मिळाव्या यासाठी सातत्याने ते राज्यात येत आहेत’, असेही त्यांनी नमूद केले.
‘उत्तरेतील जातीय राजकारण पिछाडीवर’
‘उत्तरेतील राज्यांमध्ये जातीचे राजकारण आघाडीवर होते. त्यामुळेच भाजपला तिथे यश मिळत होते. परंतु, आता चित्र बदलत आहे. जनता त्यांच्या प्रश्नांवर मतदान करत आहे. याच्या उलट द्राविडी चळवळ असलेल्या दक्षिण भारताने जातीआधारित राजकारणाला कधीच थारा दिला नाही. त्यामुळेच भाजपला अजूनही तिथे शिरकाव करता आलेला नाही. सध्या ते काही पक्ष सोबत घेऊन चंचूप्रवेश करण्याचा प्रयत्न करत असून तो फारसा यशस्वी होणार नाही’, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘काँग्रेस एकसंघ होऊन लढतोय’
पक्षातील गटबाजीला निवडणुकांमध्ये उसळी मिळते असा आजवरचा अनुभव होता. पण यंदाची निवडणूक अपवाद असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. ‘राज्यात पक्ष एक होऊन लढत असून जागावाटपावेळी असलेली नाराजी आता भूतकाळ झाला आहे’, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी भक्कम असून आगामी लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘राहुल गांधी ‘इंडिया’चा चेहरा’
‘निवडणुकीनंतर राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का, याविषयी बोलताना चेन्नीतला यांनी राहुल गांधी हे ‘इंडिया’चा चेहरा असल्याचे मान्य केले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राहुल यांनी पक्षाध्यक्षपद सोडायला नको होते, असेही मत त्यांनी व्यक्त केले. परंतु, पंतप्रधान कोण होणार हे निकालांनंतर इंडियाच्या बैठकीत ठरेल, असेही स्पष्ट केले. यूपीएच्या काळात १० वर्षे डॉ. मनमोहन सिंह हे एकच पंतप्रधान होते. त्यामुळे ‘इंडिया’चे सरकार आल्यावर दरवर्षी पंतप्रधान बदलतील हे मोदींचे विधान हास्यास्पद असल्याचे चेन्नीतला म्हणाले.
‘इव्हीएमवर आणणे मोठी चूक’
‘मतदानासाठी इव्हीएम यंत्रणा काँग्रेसनेच या देशात आणली. परंतु, तीच आमची मोठी चूक झाली, असा निर्वाळा चेन्नीतला यांनी दिला. जगात फक्त चारच देशात इव्हीएम वापरले जाते इतर ठिकाणी अजूनही मतपत्रिकांद्वारेच निवडणुका होतात. आमचे सरकार आल्यावर त्यावरही विचार होईल, असे ते म्हणाले.