Maratha Reservation: ओबीसीमधून आरक्षण जाहीरनाम्यात देणार का? मराठा आरक्षणाबाबत मविआला बावनकुळे यांचे खुले आव्हान

मुंबई : ‘ओबीसींच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देणार का हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर करावे, तसेच आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महाविकास आघाडीने असे लेखी आश्वासन द्यावे’, असे खुले आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महाविकास आघाडीला दिले. भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रपरिषदेत ते बोलत होते.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. पण ते ओबीसींचे नुकसान करून नाही, अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयातही टिकले होते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. महाविकास आघाडीने आरक्षणाबाबत नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे’, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

‘महाविकास आघाडीच्या ३१ खासदारांनी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला देऊ हे जाहीर करावे, असे त्यांना माझे आव्हान आहे. आघाडीचे नेते असे जाहीर करूच शकत नाहीत. ते खोटारडे आहेत’, असे टीकास्त्र बावनकुळे यांनी सोडले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत भारतीय, प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.
विधानसभेचे जागा वाटप राज्यातच, ठाकरे पवारांशी लवकरच चर्चा, नाना पटोले यांनी निवडणूक रणनीती सांगितली
योजनांना खीळ घालण्याचा मविआचा अजेंडा

‘मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांना राज्यात खीळ घालणे आणि त्या योजनांचा लाभ घेण्यापासून राज्यातील जनतेला रोखणे हा मविआचा एकमेव अजेंडा आहे. मविआ सरकार सत्तेत आले, तर महायुती सरकार आणि केंद्राच्या योजनांना राज्यात खोडा घालून लाडकी बहीण योजना, तीन सिलेंडर योजना, वीजबिल माफी, पीकविमा य़ोजना, गरीब अन्न योजना, आवास योजना यासारख्या योजना बंद करेल, त्यामुळे मतदारांनी सावध रहावे’, असेही बावनकुळे म्हणाले.

पुण्यात आज अधिवेशन

रविवारी पुण्यात होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनाची माहिती बावनकुळे यांनी दिली. या अधिवेशनाला पाच हजार ३०० कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनातून नवी उर्जा घेऊन प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी केंद्र आणि राज्याच्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवेल, असे बावनकुळे म्हणाले.