राज्यात मान्सूनची स्थिती काय ?
दरम्यान आज (१० जून) रोजी मान्सूनचा पाऊस मराठवाड्याच्या काही भागांत, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भाग तसेच पुणे, नगर जिल्ह्याचा काही भागात पोहोचला असून लवकरच १५ जून पर्यंत मान्सूनचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
ठाणे, नगर, बीड, निझामाबाद,सुकमा या जिल्ह्यांत मान्सून सक्रिय होणार
हवामान विभागाने आज सकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण दिशेकडील मान्सूनचा प्रवास ठाणे, नगर, बीड, निझामाबाद, सुकमा या भागातून होत असून येथपर्यंत मान्सून सक्रीय होताना दिसत आहे.
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट
हवामान विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा विभागातील काही भागांत विजा आणि गारपीटीसह वादळी पाऊस होणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईसह राज्यभरात पाणी टंचाई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव व धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मुंबईत सध्या ५ टक्के आणि १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यात असलेल्या बहुतांश धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे जलसंकट अधिक गडद झाले आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले. अशातच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून पावसाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.