मागील वर्षी पावसाने फिरवली होती पाठ
मागील वर्षी पावसाने सुरुवातीला हजेरी लावली. त्यानंतर मात्र ऐन पावसाळ्यात पाठ फिरवल्याने नाशिक आणि जळगाव जिल्हयाच्या परिसरातील नदी नाले कोरडेठाक पडले होते. खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही अपेक्षित उत्पादन न झाल्याने उत्पन्न घटले होते. परंतु यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मृग नक्षत्राची सुरुवात समाधानकारक
बळीराजाने गेल्या महिन्यात शेतातील मशागतीची कामे आटोपून घेतली आहे. पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील उष्णता देखील काही प्रमाणात कमी झाली आहे. अशातच मृग नक्षत्राची सुरुवात समाधानकारक झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
बी-बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली
दरम्यान, पेरणीयोग्य पाऊस होताच शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी केली जाते. पेरणीसाठी बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागील वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीवरही परिणाम झाला होता. यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊस पडला असल्याने बी-बियाणे व्यावसायिकांकडे गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
सिन्नर तालुक्यात चांगला पाऊस
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात मंगळवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह मृग नक्षत्राच्या पावसाची हजेरी लावल्याने बळीराजा आनंदीत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.
गिरणा नदीला आले पाणी
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल व जामनेर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. रविवारी देखील जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी रात्री जिल्ह्यातील म्हसावद, रिंगणगाव, वाकडी व नांद्रा या चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या दमदार पावसामुळे गिरणा खळाळून वाहू लागली आहे.